वाहन उद्योग संकटात   

वृत्तवेध 

चीनने सहा प्रमुख रेअर अर्थ मेटल्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगाला मोठा धक्का बसला आहे, कारण ही खनिजे इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी आणि इतर उच्च-तंत्रज्ञान उपकरणांमध्ये वापरली जातात. चीनच्या या निर्णयामुळे जागतिक चिंता वाढली आहे. चीनने एप्रिल २०२५ मध्ये ३५ रेअर अर्थ मेटल्सच्या निर्यात मंजुरीला स्थगिती दिली होती. या अंतर्गत कंपन्यांचे नवीन निर्यात परवाने मंजूर करण्यात आले नव्हते. प्रभावित कंपन्यांमध्ये कॉन्टिनेंटल आणि बॉश इंडियासारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. ते चीनमधून ही खनिजे आयात करतात. कंपन्यांना पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला असला तरी प्रक्रियेतील अनिश्चितता आणि विलंबामुळे उद्योगात तणाव निर्माण झाला आहे.
 
एकटा चीन ९० टक्के रेअर अर्थ मेटल्सचे उत्पादन करतो. वाहनांच्या इलेक्ट्रिक घटकांमध्ये वापरली जाणारी ९० टक्क्यांपेक्षा जास्त रेअर अर्थ मेटल्स चीनमध्ये बनवली जातात. त्यांचा वापर केवळ ऑटो क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर संरक्षण प्रणाली, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, पवन टर्बाइन आणि स्मार्टफोनसारख्या क्षेत्रातही आढळतो. अशा परिस्थितीत चीनकडून पुरवठा थांबवल्याने जागतिक तांत्रिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन दशकांमध्ये रेअर अर्थ मेटल उद्योगात चीनचे वर्चस्व वेगाने वाढले आहे.
 
एके काळी अमेरिकेसारख्या देशांमध्येही मोठ्या खाणी होत्या; परंतु पर्यावरणीय आणि आर्थिक कारणांमुळे त्या बंद कराव्या लागल्या. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील माउंटन पास खाण २००२ मध्ये बंद करण्यात आली. त्यामुळे चीनला जागतिक नेता बनण्याची संधी मिळाली. चीनने या क्षेत्राला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र मानले आणि त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळे ते केवळ या खनिजांचा सर्वांत मोठा उत्पादकच नाही, तर जागतिक शुद्धीकरण केंद्रदेखील बनले. भारत पर्यायांचा शोध घेत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने रेअर अर्थ मेटल्सचे देशांतर्गत साठे विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. खाण धोरणे आणि कायदे बदलून या खनिजांचा शोध आणि उत्खनन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अलीकडेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की भारत पर्यायी स्रोत आणि देशांतर्गत उत्पादनांवर वेगाने काम करत आहे.

Related Articles