चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हे भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक : डॉ. राव   

पुणे : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हा केवळ एक अभियांत्रिकी पराक्रम नसून, भारतीयांच्या प्रतिभेचे, स्थापत्य कौशल्य व क्षमतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, कामगार यांच्या सखोल अभ्यासाची, कठोर परिश्रमाची ही फलश्रुती आहे, असे प्रतिपादन आयआयटी दिल्लीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे एमिरेट्स प्राध्यापक डॉ. के. एस. राव यांनी केले. चिनाब नदीवरील रेल्वेपुलाच्या उभारणीत योगदान देणार्‍या डॉ. के. एस. राव यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
 
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल सेंटर व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी (आयजीएस) पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ’जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपूल उभारणीतील तांत्रिक व सामाजिक आव्हाने’ यावर आयोजित व्याख्यानात डॉ. राव बोलत होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात संयोजक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे मानद सचिव डॉ. उत्तम आवारी, ’आयजीएस’चे रमेश कुलकर्णी, चेअरमन सुमन जैन आदी उपस्थित होते.
 
या व्याख्यानात डॉ. के. एस. राव यांनी पुलाच्या उभारणीत आलेल्या भूगर्भशास्त्रीय अडचणी, हवामानातील बदल, कडेकपारीत काम करण्यातील जोखीम, वाहतूक व दळणवळणातील अडथळे अशा अनेक पैलूंचा सविस्तर वेध घेतला. पुलाच्या तांत्रिक बाबींप्रमाणेच स्थानिक समाजावर झालेल्या परिणामांचाही त्यांनी अभ्यासपूर्वक मागोवा घेतला. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला हा पूल ३५९ मीटर उंचीवर असून, पॅरिसमधील ’आयफेल टॉवर’पेक्षा याची उंची अधिक आहे. भारतीय रेल्वेच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुला मार्गाचा हा भाग असून जम्मू-काश्मीरच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, असे डॉ. राव यांनी नमूद केले.

Related Articles