गुजरातमध्ये चार वर्षांत १६ पूल कोसळले   

काँग्रेसचा दावा; एसआयटी चौकशीची मागणी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये मागील चार वर्षांत पूल कोसळण्याच्या १६ घटना घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी केली आहे. तसेच, मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
 
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना काँग्रेसने बडोद्यातील पूल दुर्घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने उदासीनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, भाषण आणि जाहिराती देण्यातच हे सरकार व्यस्त आहे, अशा शब्दांत टीका केली.भाजपच्या राजवटीतल सर्वत्र भ्रष्टाचार फैलावला आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
 
देशात अपघात होणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. कधी रेल्वे अपघात तर कधी उद्घाटनानंतर पुलाला लगेच तडे जाणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. देश अद्याप विमान अपघातातून सावरला नसतानाच  गुजरातमधून पूल कोसळल्याची बातमी आली, असे खर्गे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
तीन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे समोर आले होते. मात्र, यानंतरही सरकारला जाग आली नाही, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.काँग्रेस नेते जिग्नेश मेवाणी यांनी राज्यातील विविध दुर्घटनांचा आढावा घेतला. तसेच, यात बळी गेलेल्यांची आकडेवारी मांडली. राज्यात अनेक निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागत आहे. 
 

Related Articles