बनावट कृषी औषधे विकणारी टोळी पकडली   

पोलिसांची कारवाई; १२ लाखांंचा मुद्देमाल जप्त

सातारा, (प्रतिनिधी) : शेतीच्या बनावट औषधांची विक्री करणार्‍या सहा जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ५९ हजार ३७० रुपयांची बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१, रा. समता कॉलनी, शाहूपुरी), युवराज लक्ष्मण मोरे (वय २८, रा. रेवडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय ३०, रा. धालवडी, ता. फलटण), नीलेश भगवान खरात (वय ३८, रा. जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासाहेब ठोंबरे (वय ३०, रा. वडूज, ता. खटाव) व संतोष जालिंदर माने (वय ४५, रा. नडवळ, ता. खटाव), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
करंजे नाका येथे शेतीला लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनावट औषधांची खात्री करण्यासाठी टू बडी कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीचे सहायक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांना सोबत घेऊन करंजे नाका येथे सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित मालमोटारची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शेतीसाठीची औषधे होती. पिसाळ यांच्या मदतीने गाडीमधील औषधांची तपासणी करण्यात आली. त्या वेळी ती बनावट असल्याचे समोर आले. 
 
यावेळी दोन लाख सहा हजार ७०० रुपयांची बनावट औषधे व एक लाख रुपये किमतीचा छोटा टेंपो जप्त करण्यात आला. चौकशीनंतर पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून रेवडी (ता. कोरेगाव), फलटण व वडूज (ता. खटाव) येथील कारखान्यातून एकूण १२ लाख ५९ हजार ३७० रुपयांचे बायर कंपनीची बनावट राउंडप औषधे व मालमोटार जप्त करण्यात आली आहे. उपनिरीक्षक संजय ढमाळ तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी ढेरे, उपनिरीक्षक ढमाळ व पोलिस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, जयवंत घोरपडे हे या कारवाईत सहभागी होते.

Related Articles