वाचक लिहितात   

खरे दोषी शोधा

सरदार पटेल विमान तळानजीक  झालेल्या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. हे वृत्त काळीज पिळवटून टाकणारे आहे. अपघातानंतर आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. उदा: विमानाला पक्षाची धडक बसली का? दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळी बिघाड झाला? आणि इतर. पण आता त्याचा  काय उपयोग?  एक गोष्ट मात्र नक्की की, त्या विमानाच्या वैंसनिकाने विमान खाली येतेय म्हटल्यावर, संबंधित यंत्रणांशी  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सफल झाला नाही. व त्याआधीच विमान कोसळले. या दुःखात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, टाटा या कंपनीने पुढाकार घेऊन, ते  अपघातग्रस्त लोकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत आहेतच.  याव्यतिरिक्त  त्यांनी तेथील वैद्यकीय महाविद्यालयाचे  वसतिगृह उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे  सांगितले. टाटांच्या या सामाजिक कार्याला  त्रिवार सलाम. या अपघातातील लोकांना,  ज्यांनी कोणी मदत केली मग ते कोणत्याही संघटनाचे असोत किंवा स्थानिक जनता असो. अजूनही या जगात माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे, हेच यातून दिसून येते. नाहीतर  कोणत्याही  अनुचित घटनांमध्ये पीडितांना मदत करण्यापेक्षा, त्यांचे चित्रीकरण करण्यात धन्यता मानणार्‍या लोकांना, यातून   बरेच काही शिकण्यासारखे.आहे  .यथावकाश या विमान अपघाताची सखोल चौकशी होईल. परंतु या  दुर्घटनेत खरे दोषी कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार.  
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
 
मुंब्रा लोकल  दुर्घटनेनंतर मुंबईतील लोकलने प्रवास करणार्‍या  प्रवाशांच्या सुरक्षेचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या दुर्घटनेनंतर  रेल्वे मंत्रालयाने  लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी  सर्व लोकलना स्वंयचलीत दरवाजे बसवण्याचे घोषित केले तर मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकल वातानुकूलित करून लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली. लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यास अनेकांनी विरोध केला. लोकलमधील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजे हा उपाय योग्य ठरणार नाही. स्वयंचलित दरवाज्यामुळे घुसमट होऊन  लोकलमधील प्रवाशांचा जीव गुदमरणार नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि तो योग्यही आहे. सर्वच लोकल वातानुकूलित करण्यास ही विरोध होतोय कारण लोकल वातानुकूलित  केल्यावर तिकिटांचा दर वाढेल पर्यायाने सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावरच गदा येऊ शकते. मुंब्रा दुर्घटनेनंतर अशी दुर्घटना घडू नये यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या जात आहेत. मूळ प्रश्न हा मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा आहे.  वाढत्या लोकसंख्येपुढे सर्वच साधनसामुग्री अपुरी पडत आहे. कितीही आणि कोणत्याही उपाययोजना केल्या तरी त्या वाढत्या लोकसंख्येपुढे अपुर्‍याच ठरणार आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
अतिदक्षता हवीच
 
अहमदाबाद भीषण विमान दुर्घटनेत २४२ जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या बोइंग ’ड्रीमलायनर’ने अनेकांचे जीवन हिरावून घेतलेच शिवाय त्यांच्या कितीतरी प्रियजनांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली! जगणे कसे बेभरवशाचे आणि जीवन मृत्यूच्या हिंदोळ्यावरील आहे याचाच प्रत्यय आला! ’आकाश,समुद्र किंवा पर्वतगुंफा, अशी कोणतीच जागा नाही जिथे मृत्यू पोहोचत नाही!’ हे भगवान बुद्धांचे वचन खरेच आहे! जोखमीचे काम वा जोखमीच्या जागेवर काम करताना कसे दक्ष राहायला हवे याचाच धडा सदर दुर्घटनेतून मिळाला आहे! आजवर अशा कितीतरी भीषण विमान  दुर्घटना झाल्या परंतु यातून कसलाही बोध न घेता पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे हे दुर्दैवी दुष्टचक्र चालूच आहे, हे भयंकर खेदजनकच! 
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)
 
कार्यकर्त्यांचे मनोमीलन?
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बैठक होवून उभय नेत्यांमध्ये दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाल्याचे वृत्त आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरु झाल्याचे यातून पुढे आले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असताना ही बैठक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्तेही एकत्र येण्यास सुरूवात केली आहे. राज आणि उद्धव अजून एकत्र आले नसले तरी त्यापूर्वीच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राज्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.
 
राजू जाधव, मांगूर

Related Articles