अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप   

अबूधाबी : अमेरिकेतील आर्चर एव्हिएशन कंपनीने अबू धाबीमध्ये त्यांच्या पहिल्या स्वयंचलित इलेक्ट्रिक हवाई टॅक्सीच्या यशस्वी उड्डाणाची घोषणा केली. कंपनीचे अबूधाबीमधील हे पहिले उड्डाण असून, २०२६ पर्यंत सामान्य नागरिकांसाठी ही हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. 
 
अल बतीन एक्झिक्युटिव्ह विमानतळावर आर्चरच्या हवाई  टॅक्सीचे चाचणी उड्डाण करण्यात आले. ही हवाई टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक असून, लहान शहरी  वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे. टॅक्सीच्या पुढील चाचण्या विशेषतः  संयुक्त अरब अमिरातमधील उष्ण हवामान, जास्त आर्द्रता आणि धूळ यासारख्या परिस्थितींमध्ये पार पडणार आहेत.
 
ही टॅक्सी विशेषतः शहरांतील अल्प पल्ल्याच्या प्रवासासाठी म्हणजे विमानतळ ते शहराचे केंद्र अशी वाहतूक सोपी करण्यासाठी वापरली जाईल. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. ही सेवा केवळ श्रीमंत प्रवाशांसाठी नाही, तर सामान्य जनतेसाठीही किफायतशीर दरात उपलब्ध  करून देण्यात येणार आहे. दुर्गम भागात जिथे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाहीत, तिथे ही टॅक्सी सेवा उपयुक्त ठरू शकते. 
 
या हवाई टॅक्सींना आधार देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी आता संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू झाली आहे, ज्यामध्ये अबू धाबी क्रूझ टर्मिनलवरील पहिले हायब्रिड हेलीपोर्ट समाविष्ट आहे.
 

Related Articles