कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही   

 

आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट; सिद्धरामय्या यांचे आरोप खोडून काढले
 
नवी दिल्‍ली : कोरोनाची लस आणि हृदयविकाराचा झटका याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. आयसीएमआर आणि एम्स यांच्या संशोधनात ही बाब प्रकर्षाने स्पष्ट झाल्याचा दावाही केला आहे. 
 
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भातील विधान नुकतेच केले होते. ते आरोग्य मंत्रालयाने खोडून काढले आहे. कर्नाटकातील हासन जिल्ह्यात कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्‍तीचा अचानक मृत्यू झाला होता.  तेव्हा सिद्धरामय्यांना यांनी कोरोना लशीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा मंगळवारी केला होता. लशीला घाईगडबडीत मंजुरी दिली आणि वितरण केले. ते एक कारण मृत्यूचे असल्याचे म्हटले होते. छातीत वेदना, श्‍वास घेण्यात अडचण येत असले त नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. 
 
त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, नागरिकांच्या अचानक मृत्यूचा तपास देशातील विविध संस्थांनी केला. त्यांच्या मृत्यू आणि कोरोनाची लस यांचा एकमेकाशी कोणताही संबंध नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) यांच्या संशोधनात स्पष्ट झाले की, कोरोनाची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. लशीच्या दुष्पप्रभावाच्या घटना कमी आहेत.हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची कारणे अनेक आहेत. त्यामध्ये अनुवंशिकता, जीवनशैली, पूर्वीचे आजार आणि कोरोनानंतरच्या गुंतागुंती यांचा समावेश असतो, असे मंत्रालयाने नमूद केले. दरम्यान, 18 ते 45 वयोगटातील तरुणांचा अचानक मृत्यू का होत आहे ? याची कारणे दोन्ही संस्था शोधत आहेत.
 

Related Articles