बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा   

काँग्रेस ची मागणी 

नवी दिल्ली : बिहारमधील भाजप-जेडीयू सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. कायदा आणि सुव्यवस्था तसेच मतदार यादीच्या सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणीदेखील काँग्रेसने केली.
 
सुधारित मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना बरीच यातायात करावी लागत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने रचलेला हा कट असल्याचा आरोपदेखील काँग्रेसने केला.बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी पत्रकार परिषदेेत भाजप-जेडीयू सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राजद नेते  तेजस्वी यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानाजवळ गोळ्या झाडल्या जातात. मात्र, अद्यापही आरोपी सापडलेले नाही. 
 
प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांच्या हत्येचा संदर्भ देत सिंह म्हणाले की काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचीही हत्या करण्यात आली होती. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. बिहारमधील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज हत्या होत आहेत. परंतु, सरकार झोपेत आहे, असा आरोपही त्यांनी केला. बिहारमध्ये जेव्हा जेव्हा नितीश कुमार आणि भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा राज्यात खून आणि बलात्कारासारखे गुन्हे वाढतात, असेही ते म्हणाले.बिहार सध्या संकटातून जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांनी विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावावे, अशी मगणी केली. या वर्षी एकट्या पाटण्यात ११६ खून आणि ४१ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. मागील १५१ दिवसांत पोलिसांवर १,२९७ हल्ले झाले, असेही ते म्हणाले.

Related Articles