ज्यो बायडेन यांना कर्करोगाचे निदान   

 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ  नेते ज्यो बायडेन यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग झाला आहे. 
ज्यो बायडेन ८२ वर्षांचे असून त्यांनी मूत्रविसर्जन संदर्भात तक्रार केली होती. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान झाल्याचा अहवाल नुकताच दिला. कर्करोग आता हाडापर्यैंत पसरल्याचे नमूद केले आहे.प्रोस्टेट कर्करोगाची तीव्रता ९ च्या आसपास आहे. कर्करोग हाडांच्या माध्यमातून शरीरात पसरत जातो. त्यामुळे कर्करोगाच्या गुठळ्यांपर्यत औषधे पोहोचविणे जिकिरीचे बनते. त्यामुळे सर्वसाधारण कर्करोगाप्रमाणे रुग्णांवर उपचार करणे अवघड जाते. अशा व्याधीमध्ये रुग्ण जेमतेम चार ते पाच वर्षे जीवन जगू शकतो, अशी माहिती मॅसॅच्युसेट्स जनरल ब्रिगहॅम कर्करोग केंद्राचे डॉ. मँथ्यू स्मिथ यांनी दिली. 
 
ते म्हणाले आजारावर उपचार करता येतील. पण, तो बरा करता येण्याजोगा नाही. अशा परिस्थितीत औषधांनी उपचार करता येतात. पण, किरणोत्सर्गी उपचार करण्याची परवानगी देता येणार नाही. दरम्यान, विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांना कर्करोगाचे निदान झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते लवकर बरे व्हावेत, असा संदेश त्यांनी पाठवला आहे. त्यामध्ये माजी अध्यक्ष बराक ओबामा, माजी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बायडेन यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून लवकर बरे व्हा, असा संदेश पाठवला आहे. 
 

Related Articles