हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट   

नवी दिल्ली :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र  सुरू आहे. त्या अंतर्गत नौदल प्रमुखानंतर हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. एका पाठोपाठ एक अशा दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी मोदी यांची भेट घेतली असल्याने पाकिस्तानवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. 
 
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतली. २२ एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ पर्यटकांचे प्राण घेतले होते. . यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्यासह हवाई दलाच्या अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी मोदी यांची भेट घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हवाई दल प्रमुख आणि मोदी यांची स्वतंत्र बैठकही  झाली. त्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. त्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  अजित डोवाल देखील उपस्थित होते.
 
सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य
 
पहलगामच्या हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. तेव्हा सरकारने दहशतवादाचा नाश करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाचा पुनरुच्चार केला होता. दहशतवादी हल्ल्याला जबाबदार आणि कारस्थान रचणर्‍यांना  कठोर शिक्षा देण्यात येईल, असा इशारा दिला होता.  तसेच सरकारने तिन्ही सैन्य दलाला कारवाई करण्याबाबतचे स्वातंत्र्य दिले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तेव्हा विरोधी पक्षांनी सरकार जी कारवाई करेल त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. 

Related Articles