DGCAच्या पाहणीत विमानवाहतुकीतील त्रुटी उघड   

टायर झिजलेले, धावपट्टीही पुसट .. ; व्यवस्था 'अधांतरी'

नवी दिल्ली : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) केलेल्या मोठ्या विमानतळांच्या पाहणीतून हवाई वाहतूक व्यवस्थेतील बरेच दोष समोर आले. विमानाचे टायर झिजलेले, धावपट्टीवरील मध्य रेषाच पुसट झालेली, सिम्युलेटरचा अभाव अशा बऱ्याच त्रुटी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर आढळल्या. विमानतळांवरील दोषांबरोबरच विमानांच्या देखभाल-दुरुस्तीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. देखभालीत दोषांची पुनरावृत्ती झाल्याचेही दिसल्याने देखरेख प्रभावीपणे होत नसल्याचे अधोरेखित झाले.
 
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर ‘डीजीसीए’च्या संयुक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी दिल्ली, मुंबईसह देशातील मोठ्या विमानतळांवर रात्री आणि पहाटेच्या वेळी पाहणी केली. विमानोड्डाणांचे कार्यसंचालन, रॅम्प सुरक्षा, हवाई वाहतूक नियंत्रण, संवाद, विमानोड्डाणपूर्व वैद्यकीय मूल्यमापन अशा विविध घटकांची पडताळणी यावेळी केली.
 
काही विमानतळांच्या धावपट्ट्यांवरील मध्यरेषा पुसट आढळण्यापासून ते विमानाच्या रचनेला अनुरूप सिम्युलेटरचा अभाव, सॉफ्टवेअर तीन वर्षे अपडेटच केलेले नाही, अशा बऱ्याच बाबी ‘डीजीसीए’च्या पाहणीत आढळल्या. देशांतर्गत उड्डाणासाठी सज्ज झालेल्या विमानाचे टायरच झिजलेले आढळले. त्यामुळे उड्डाण लांबणीवर गेले आणि टायर बदलल्यानंतरच विमानाने उड्डाण घेतले. बऱ्याचदा विमानांतील दोष निदर्शनास आणूनही ते पुन्हा दिसले. त्यामुळे प्रभावी देखरेख होत नसल्याचा आणि अपुऱ्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला, असे ‘डीजीसीए’च्या निवेदनात म्हटले.
 
विमानांच्या देखभाल-दुरुस्तीवेळी सुरक्षानियम पाळणे आवश्यक असते. मात्र, अभियंत्यांकडून त्याचे बऱ्याचदा उल्लंघन झाले. विमानतळ परिसरात नवी बांधकामे होऊनही काही वर्षे सर्वेक्षणच केलेले नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. मात्र, ‘डीसीसीए’ने या विमानतळांच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. विमानतळावरील विमानांच्या हालचालींची बारकाईने पाहणी करण्यात आली. हवाई क्षेत्रातील सुरक्षा मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हवाई वाहतूक व्यवस्थेतील दोष शोधण्यासाठी यापुढेही समग्र सर्वेक्षण कायम राहील, असे ‘डीजीसीए’ने म्हटले.

सात दिवसांत दोषनिवारणाची सूचना

विमानतळ आणि विमानांमध्ये आढळलेल्या दोषांबाबत संबंधितांना कळवले आहे. त्यांना सात दिवसांत दोष निवारणाची सूचना करण्यात आल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. मात्र, हे दोष कोणाचे, याबाबत कोणत्याही हवाई कंपनी किंवा हवाई क्षेत्राशी संबंधितांच्या नावाचा उल्लेख ‘डीजीसीए’ने केलेला नाही.

बोइंग विमानांची सेवा स्थगित करण्याची मागणी

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे सुरक्षा परीक्षण होईपर्यंत एअर इंडियाच्या ताफ्यातील बोइंग विमानांची सेवा स्थगित करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. एअर इडियासह अन्य हवाई कंपन्यांच्या विमानांची कोणतीही पूर्वसूचना न देता तपासणी करण्याचे निर्देश ‘डीजीसीए’सारख्या संस्थांना द्यावेत, अशी मागणीही ऍड.अजय बन्सल यांनी अर्जाद्वारे केली.

Related Articles