किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच   

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांंचा शोध घेण्याची मोहीम शुक्रवारी तिसर्‍या दिवशी सुरू आहे. जंगली भागाने वेढलेल्या परिसरात अतिरिक्त जवान पाठवून तो वेढला आहे.
 
घनदाट जंगलातील कंझाल मांडू परिसरात बुधवारी दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक उडाली होती. यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शोध आणि दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्याची मोहीम कुचाल परिसरात सायंकाळी पावणेआठ वाजता सुरू केली. मोहीमेची व्याप्ती छात्रो वन विभागपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्या माध्यमातून दहशतवादी लपलेल्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. एक ते दोन दहशतवादी तेथे लपल्याचा अंदाज आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि श्वानपथकांचा वापर कारवाईत  केला जात आहे. तसेच अतिरिक्त जवानही परिसरात रवाना केले जात आहेत. 
 
 दरम्यान, जम्मू विभागात गेल्या आठवड्यात २६ जून रोजी पाकिस्तानातील जैश ए महम्मदचा दहशतवादी ठार मारला गेला होता. तेव्हा तीन दहशतवादी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड परिसरात पळून गेले होते. त्यानंतर बुधवारी दुसरी शोध  मोहीम राबविण्यात आली.
 

Related Articles