टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज   

भाग्यश्री पटवर्धन 

टॉरेन्ट फार्माने ११ हजार कोटी रुपये मोजून जेबी केमिकल्स कंपनी ताब्यात घ्यायचे ठरवले आहे. अपोलो हॉस्पिटल्स डिजिटल हेल्थ आणि औषध उत्पादन यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणार आहे. या दोन्ही बातम्यांमुळे संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल दिसून आली.
 
औषध उत्पादन क्षेत्रातील दोन घडामोडी गेल्या आठवड्यात महत्वाच्या ठरल्या. मागील स्तंभातही आपण आरोग्याशी संबंधित कंपनीबद्दल दिलेला सल्ला वाचल्याचे आठवत असेल. टॉरेन्ट फार्माने 11 हजार कोटी रुपये मोजून जेबी केमिकल्स कंपनी ताब्यात घ्यायचे ठरवले आहे. अपोलो हॉस्पिटल्स डिजिटल हेल्थ आणि औषध उत्पादन यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणार आहे. या दोन्ही बातम्यांमुळे संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल दिसून आली. प्रथम टॉरेन्ट फार्माच्या व्यवहाराविषयी माहिती घेऊ. सध्या या कंपनीचा शेअर  ३४०० रुपयांच्या घरात आहे. नुवामा या दलाली पिढीने दिलेल्या एका अंदाजानुसार आगामी काळात कमाल १५ टक्के वाढ शेअर भावात दिसेल. याचा अर्थ हा शेअर ३९००-४००० रुपयाची पातळी गाठेल; मात्र ही वाढ लगेच होणार नाही. कोणत्याही कंपनीचे दुसर्‍या कंपनीत जेव्हा विलीनीकरण होते, त्याला वर्ष-दीड वर्षाचा काळ लागतो. संबंधित सर्व प्रक्रिया, नियमकांची मंजुरी, भागधारकांची मान्यता या बाबी पूर्ण कराव्या लागतात. विलीनीकरण सूत्र (५१ TRP shares for every १०० जेबीसीपी शेअर्स) असे राहणार आहे. याचा अर्थ प्रत्येकी १०० जेबी केमिकल्स शेअरमागे टॉरेन्टचे ५१ शेअर मिळतील.
 
कोलबर्ग क्रॅवीस या जगातील बलाढ्य खासगी गुंतवणूकदारांकडून पहिल्या टप्प्यात ४६.३९ टक्के हिस्सा टॉरेन्ट खरेदी करेल. जेबीसीपीच्या कर्मचार्‍यांकडून आणखी २.८ टक्के हिस्सा १६०० रुपये प्रति शेअर भावात खरीदला जाईल. या व्यवहाराचे एकूण मूल्य २५,७०० कोटी रुपये आहे. देशातील हृदयरोगाशी संबंधित उपचार आणि औषधांच्या बाजारपेठेत सर्व व्यवहार पूर्ण झाल्यावर पाचवे स्थान प्राप्त करेल. हृदयविकार झालेल्या व्यक्तीला किती खर्च येतो आणि औषधे किती आणि कशी वापरली जातात याची कल्पना बहुतेकांना आहे. त्यावरून या व्यवहाराचे महत्व लक्षात येते.
 
आता दोन्ही कंपन्यांचे कमाल किमान भाव पाहू टॉरेन्ट (५२-wk high ३,५९०.७०, ५२-wk low  २,७९९.८५) आणि जेबी केमिकल्स (५२-wk high २,०३०.००, ५२-wk low १,३८५.७५) हे भाव गेल्या आठवड्यातील आहेत. आगामी वर्षात त्यात मोठी वधघट आणि उलाढाल दिसणार आहे. नुवामा पेढीच्या अंदाजाचा विचार केल्यास घसरणीवेळी थोडेथोडे शेअर खरेदी करणे आर्थिक आरोग्याला बळकटी देईल असा जाणकारांचा होरा आहे.
 
अपोलो हॉस्पिटलबाबतची घडामोडही उत्साहवर्धक आहे. कंपनीच्या व्यवसायाची फेररचना यानिमित्ताने होणार आहे. सध्या आरोग्याच्या क्षेत्रात वर म्हटल्याप्रमाणे व्यवसाय वाढीस जो वाव आहे, त्यात तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांची सांगड घालणे गरजेचे आहे. याचा अर्थ आजही शहरी भागात रात्रीच्या वेळेस एखाद्या रुग्णाला सिटीस्कॅन करायचा असल्यास ती यंत्रणा किती विश्‍वासार्ह आणि घराजवळ असेल याबाबत मतमतांतरे आहेत. या एका उदाहरणावरून जवळच्या औषध दुकानात येणारा ग्राहक आणि त्याच्या आरोग्यविषयक गरज याची सांगड घालून व्यवसाय वाढवण्याचे अपोलोने ठरवले आहे. ही प्रक्रिया दीड वर्ष चालेल. तीनुसार अपोलो हॉस्पिटलच्या भागधारकांना ज्या प्रमाणात नव्या कंपनीचे शेअर मिळणार आहेत ते असे (१०० शेअरमागे नवे १९५.२) नुवामाने याही कंपनीबाबत दिलेला अंदाज खरेदी सुचवतो. जून २०२७ चा विचार केल्यास अपोलो कंपनीचा शेअर ८६०० रुपये पातळी गाठेल, असा अंदाज आहे. सध्याचा व्यवसाय २५ हजार कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

Related Articles