पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना   

माथेफिरुला अटक

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुरज शुक्ला (वाराणसी, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. शुक्ला याचे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे की कसे? याची माहिती घेतली जात आहे.
 
शुक्ला परवा मध्यरात्रीच्या सुमारास केशरी वस्त्र परिधान करून कोयता हातामध्ये घेऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चौथर्‍यावर चढला. त्यानंतर, पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने वार केले. घडलेला प्रकार प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुक्ला याला चौथर्‍यावरून उतरवून ताब्यात घेतले.शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील असून धार्मिक पुस्तके आणि माळा विकण्याचे काम करतो. कुंभमेळा संपल्यानंतर तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्यानंतर, काही दिवस तो वाईत वास्तव्यास होता. तेथून त्याने कोयता आणून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या हेतूने केले? तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का?, याचा तपास पोलिस करत आहेत.      
 
या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुक्ला याच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जात आहे. त्याने हे कृत्य आधीपासून नियोजित केले होते का? की अचानक मानसिक असंतुलनातून हे कृत्य घडले, याचा शोध घेतला जात आहे. 
 
काँग्रेसकडून चौकशीची मागणी
 
या घटनेचा काँगेस पक्षाने निषेध केला असून, घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन केले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. तसेच, पोलिसांनी संबंधित आरोपीला मनोरुग्ण वगैरे ठरवू नये, या संपूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित तपास करावा, अशी मागणीदेखील काँग्रेसने केली. 

Related Articles