वाचक लिहितात   

शिक्षणाचा दर्जा वाढावा

शिक्षणाच्या बाबतीत भारत जागतिक शैक्षणिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आहे. त्या धोरणानुसार भारताने विदेशी उच्च शैक्षणिक संस्थांना कॅम्पस तयार करून ते चालविण्याचे परवाने देण्यात येणार आहे. यूजीसीच्या २०२३ च्या औपचारिक संमतीनंतर देशात येत्या शैक्षणिक वर्षात १५ विदेशी विद्यापीठ कॅम्पस सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार लिव्हरपूल विद्यापीठ, साऊथहॅम्पटन विद्यापीठ यांच्या बरोबरच ऑस्ट्रेलिया विद्यापीठ कॅम्पस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतिवर्षी भारतातील विद्यार्थी मोठ्या संख्येने विदेशात जात असतात. जर विदेशी विद्यापीठांनी भारतात वेगवेगळ्या शहरांत कॅम्पस उघडून शिक्षण देण्यास सुरुवात केली, तर भारतीय विद्यार्थ्यांना विदेशांत जाण्याची गरज भासणार नाही. तिथे जाण्याचा लाखो डॉलर्सचा खर्च वाचू शकेल. विदेशी शिक्षणाचा दर्जा आणि महत्त्व ओळखून चीनने पूर्वीच विदेशी विद्यापीठांना कॅम्पस उघडण्यास परवाने दिले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, म्हणजेच येथील शालेय शिक्षणाचा दर्जा विदेशी विद्यापीठांच्या शिक्षण दर्जांसमान राखण्याची जबाबदारी येथील स्थानिक शिक्षण संस्थांना पार पाडावी लागणार आहे. त्या प्रमाणे विदेशांतून प्रशिक्षण आणि संशोधन करण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना येथे सामावून घेणे भाग पडणार आहे, तेव्हा कुठे परदेशी उच्च शिक्षण संस्थांचा येथील प्रवेश अर्थपूर्ण ठरेल, येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणि विकास यांमध्ये सातत्याने वाढ होण्याची अपेक्षा 
ठेवता येईल.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
बालकांना सैनिकी प्रशिक्षण नको
 
महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा एक भाग म्हणून तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच राज्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरील सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना नियमितपणे शारीरिक व्यायाम करण्याची सवय लागावी आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्र्यांकडून सांगण्यात आले. वास्तविक सहा-सात वर्षांच्या उमलत्या वयातील लहानग्यांना शिस्तीचे सैनिकी प्रशिक्षण देणे कितपत उचित आहे, याबद्दल शिक्षण तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यापूर्वी बालमानस तज्ज्ञ, बालसमुपदेशक, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांचेही मत विचारात घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका, युरोपियन देश अशा प्रगत देशातही इतक्या लहान वयात सैनिकी प्रशिक्षण दिले जात नाही. लहान मुलांच्या खेळण्याच्या आणि बागडण्याच्या वयात, मानसिक आणि शारीरिक विकासाच्या टप्प्यात आणि जीवनातील निखळ आणि निर्भेळ आनंदाच्या दिवसात त्यांना शिस्तीचे सैनिकी प्रशिक्षण देणे कितपत योग्य आहे?
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
अल्पवयीन मुलांना आवरा
 
अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास बंदी असतानाही अनेक अल्पवयीन मुले भरधाव वेगात दुचाकी चालवताना दिसतात. या अल्पवयीन मुलांकडे गाडी चालवण्याचा परवाना नसतो, त्यांना वाहतुकीचे नियम माहीत नसतात, तरीही ही मुले पालकांना न विचारता घरातून दुचाकी घेऊन भरधाव वेगात चालवत असतात. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक व महिलांना होतो. भरधाव वेगाने दुचाकी चालविल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. ही अल्पवयीन मुले भरधाव वेगात दुचाकी चालवत असल्याने ते स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. भरधाव वेगात दुचाकी चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणार्‍या अल्पवयीन मुलांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
गड-किल्ल्यांबाबत उदासीनता 
 
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेले अनेक शिवकालीन गडकिल्ले, नानाविध पौराणिक मंदिरे, असंख्य लेण्यांचा वैभवशाली असा वारसा लाभला आहे. तथापि हा वारसा जपण्यात आपण सपशेल अपयशी आणि कपाळकरंटे ठरलो आहोत. उठता बसता शिवरायांच्या नावाने राजकारण करणारे राजकारणी शिवकालीन गडकिल्ले संवर्धनाबाबत किती उदासीन आहेत हे या गडकिल्ल्यांच्या आजच्या एकूणच दुरवस्थेतून अधोरेखित होते. नागरिक देखील आपला हा ऐतिहासिक वारसा, समृद्ध परंपरा धुळीस मिळवण्यात तसूभर देखील कमी नाहीत. हे गडकिल्ले असू देत, पौराणिक मंदिरे असू देत, की लेण्या असू देत आपल्या ’चित्रकार’ नागरिक आणि ’प्रेमीयुगल’ मंडळींनी आपापल्या निशाण्या या ठिकाणी सोडण्याचा ज्याप्रकारे चंग बांधलेला दिसतो यावरून अधोरेखित होते. आपल्या वैभवशाली वारसा स्थळांचे नानाविध प्रकारे विद्रुपीकरण करण्यात काय मजा येते? हे एक कोडेच आहे. उलटपक्षी आपल्या तुलनेत विदेशी नागरिक आपली वारसा स्थळे जपण्यात अधिक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असल्याचे दिसून येते. यातून जगात काय संदेश जातो याबाबत मात्र आपले नागरिक अनभिज्ञ दिसतात. 
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 

Related Articles