डॉ. दीपक टिळक पंचतत्त्वात विलीन   

‘केसरी’ आणि टिळक विद्यापीठाचा आधारस्तंभ हरपला

पुणे : ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व विविध संस्थांचे आधारवड डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव डॉ. रोहित टिळक, कन्या डॉ. गीताली टिळक, स्नुषा डॉ. प्रणति रोहित टिळक, जामात, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. दीपक टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचे पणतू होत. डॉ. टिळक काही दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते. काल पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव केसरीवाड्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. त्यानंतर ११.३० वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पार्थिव नेण्यात आले. दुपारी १२.३० च्या सुमारास डॉ. टिळक यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, साहित्य यांसह विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, ज्येष्ठ संपादक एस. के. कुलकर्णी, ‘केसरी’चे माजी संपादक अरविंद व्यं. गोखले, तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर, प्रसिद्ध व्यावसायिक सौरभ गाडगीळ, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, रवींद्र माळवदकर, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदींनी डॉ. टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.डॉ. दीपक टिळक यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९५२ रोजी पुण्यात झाला. 
 
बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. एमबीए नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. 
डॉ. टिळक हे टिळक स्मारक मंदिर, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, अनाथ हिंदू महिलाश्रम, श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट, वैदिक संशोधन मंडळाचे अध्यक्ष होते. तर रोझ सोसायटी ऑफ पुणेचे मानद मुख्य सल्लागार होते. पूना ज्यूदो असोसिएशनचे ते सचिव होते. 
 
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते ज्युदोपटू ही त्यांची ओळख होती. ज्यूदो खेळातील ब्लॅक बेल्ट ८ वे दान त्यांनी पटकावले. डॉ. टिळक यांचा पी. के. ऊर्फ अण्णा पाटील फाऊंडेशनचा पुरूषोत्तम पुरस्कार, सुशील सोशल फोरम पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तायोतोशी ज्यूदो-कराटे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक-आधुनिक भारताचे जनक, इंदुकिरण, बिझनेस एथिक, इव्हेंट मॅनेजमेंट, न्यू सोशल मीडिया आणि स्वराज आदी ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. 
 
राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन झालेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या चौफेर प्रगतीचे श्रेय डॉ. दीपक टिळक यांच्या दूरदृष्टीला जाते. लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे पुढे नेला. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात डॉ. दीपक टिळक यांनी केलेले कार्य मोलाचे ठरले. 
 
डॉ. टिळक विचारवंत, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असणारे डॉ. टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खदायक आहे. डॉ. टिळक यांनी कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत ’केसरी’ सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व लोकशिक्षणाचा ध्यास जनसामान्यांसमोर मांडला. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

- सी.पी. राधाकृष्णन, राज्यपाल

सामाजिक संस्थांचे आधारवड

लोकमान्य टिळक यांच्या वारशाचे डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे जतन केले. सामाजिक संस्थांचे ते आधारवड होते. वसंत व्याख्यानमाला, वेदशास्त्रोत्तेजक सभा यांच्या वाटचालीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. नुकताच वसंत व्याख्यानमालेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात साजरा झाला.
 
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात १ ऑगस्ट १९८३ मध्ये करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अलिकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पुरस्कारार्थींच्या डॉ. टिळक यांच्याकडून होणार्‍या निवडीवर सर्वसामान्यांच्या पसंतीची मोहोर उमटत असे. 
 
दरवर्षी १ ऑगस्टच्या कार्यक्रमात डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा एक-एक पैलू लोकांसमोर आणत, त्यावर जागृती घडवीत असत.
लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लांबत असल्याने नागरिकांना मनस्ताप होतो. हे लक्षात घेऊन मानाच्या पाचव्या केसरी गणेशोत्सवाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्याऐवजी टिळक रस्त्याने काढण्याचा धाडसी निर्णय डॉ. दीपक टिळक यांनी घेतला. यानिर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले होते. केसरी गणेशोत्सवात गुलालाची उधळण न करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले.

श्रद्धांजली...

डॉ. टिळक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. 

-  नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

संवेदनशील पत्रकार हरपला : अजित पवार

मुंबई : जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

तेजस्वी कालखंडाचा अस्त : शिंदे

संघर्षमय काळातही नीतिमूल्यांची कसोशीने पाठराखण करणारे ज्येष्ठ संपादक डॉ. टिळक यांच्या निधनाने मराठी संस्कृतीने खूप काही गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी पत्रकारितेतील एक तेजस्वी कालखंड अस्ताला गेला असेच म्हणावे लागेल. ‘केसरी’चे विश्स्त-संपादक, लोकशिक्षणाचा वसा घेतलेले शिक्षणतज्ज्ञ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, तळमळीचा लोकशिक्षक अशी चौफेर कामगिरी त्यांनी केली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अस्तित्व पणाला लावून लोकमान्य टिळक यांचा ‘केसरी’ लढला होता. स्वातंत्र्यानंतर त्याच ‘केसरी’ वृत्तपत्राने लोकशिक्षणाचा वसा घेतला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहे. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेकांना डॉ. टिळक यांच्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात पदवी मिळवण्याचे स्वप्न साकारता आले, ही फार मोठी कामगिरी आहे. पत्रकारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या. शिक्षण आणि पत्रकारिता हे प्रबोधनाचेच दोन मार्ग आहेत. डॉ. टिळक यांनी दोन्ही मार्गांवर मोठी कामगिरी बजावली. त्यांचे कार्यकर्तृत्व पुढील पिढ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभासारखे दिशादर्शक राहील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
 
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला ‘केसरी’ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य असा बाणा आहे. हा ऐतिहासिक वारसा अत्यंत समर्थपणे सांभाळणारे डॉ. दीपक टिळक हे एक समर्थ व्यक्तीमत्त्व होते. डॉ. टिळक यांच्या निधनाने देशाच्या सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

- रक्षा खडसे, केंद्रीय राज्य मंत्री

डॉ. टिळक यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायक आहे. डॉ. टिळक यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणाचा आणि आईकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा अत्यंत जबाबदारीने आणि उल्लेखनीय कार्यातून नेहमीच जपला. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांतील उपक्रमांना त्यांनी नेहमीच भरभरून प्रोत्साहन आणि साहाय्य केले.

- सुप्रिया सुळे, खासदार 

डॉ. टिळक यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करो.

- पीयुष गोयल, खासदार 

डॉ.  टिळक यांच्या निधनाने एक विचारवंत, संवेदनशील पत्रकार आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. ’केसरी’च्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती आणि मूल्याधिष्ठित विचारांचे जतन केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची भूमिका लक्षणीय होती. 

- मंत्री छगन भुजबळ

डॉ. टिळक यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले आहे. डॉ. टिळक यांनी लोकमान्यांचा वारसा समर्थपणे चालवत शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. लोकमान्यांची विचारधारा आणि मूल्यांची परंपरा त्यांनी कृतिशीलतेने पुढे नेली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांची भूमिका मोलाची ठरली. ‘केसरी’चे विश्वस्त संपादक म्हणून पत्रकारितेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 

डॉ. टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोट्टायममधील आमच्या निवासस्थानाला दिलेली भेट माझ्या स्मरणात आहे. टिळक कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

- मामेन मॅथ्यू, मुख्य संपादक, मल्याळम मनोरमा

डॉ. टिळक यांनी शैक्षणिक तसेच पत्रकारिता यांसह सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान सदैव प्रेरणा देत राहील.

- धनंजय मुंडे

चिंतनशील व्यक्तिमत्त्व हरपले : विखे-पाटील

डॉ. टिळक यांच्या निधनाने आपण शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी व्यक्त केली.लोकमान्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य डॉ. टिळक यांनी सातत्याने केले. लोकमान्यांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त म्हणून त्यांनी वृत्तपत्राची परंपरा जपत राष्ट्रभक्तीच्या विचारांची मांडणी केली. सामाजिक मूल्यांचा संदेश त्यांनी पत्रकारितेमार्फत दिला.
 
टिळक कुटुंबीयांचा सामाजिक वारसा पुढे नेताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला नवा आयाम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. टिळक यांच्या संकल्पनेतून घडले. डॉ. टिळक यांच्या निधनाने सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, ही मोठी हानी आहे, असेही ते म्हणाले.

धाडसी व उत्साही व्यक्तिमत्त्व

डॉ. दीपक टिळक हे अतिशय धाडसी व उत्साही होते. केसरी हे वर्तमानपत्र त्यांनी कठीण काळातही समर्थपणे चालविले. टिळक विद्यापीठाला त्यांनी अडचणीतून बाहेर काढले. मोठ्या कष्टाने काम करून त्यांनी ते पुढे नेले. टिळक विद्यापीठाशी माझाही जवळचा संबंध आला होता. डॉ. दीपक टिळकांनी मोठे धाडस करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार दिला होता. ते संयमाने सर्व परिस्थिती हाताळणारे होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता, शिक्षण व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले

डॉ. नीलम गोर्‍हे यांची श्रद्धांजली

मुंबई : लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले, अशा शोकभावना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केल्या. 
 
डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, डॉ. दीपक टिळक यांनी टिळक घराण्याचा वारसा समर्थपणे चालवत शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक यांची विचारधारा आणि मूल्यांची परंपरा त्यांनी कृतिशीलतेने पुढे नेली. टिळक महाराष्ट्र  विद्यापीठाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये त्यांची भूमिका मोलाची ठरली. दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक म्हणून पत्रकारितेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. 

सार्वजनिक जीवनाची हानी

माझ्या लहाणपणी मी त्यांना एक ख्यातनाम जुदोपटू म्हणून ओळखत होतो. त्यांनी या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. पुढील काळात त्यांनी कै. जयंतराव टिळक यांचे कार्य समर्थपणे पुढे चालवले आणि लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा जपला.  केसरी-मराठा संस्था, केसरी वृत्तपत्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, वक्तृत्वोत्तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला, ग्रंथोत्तेजक सभा, टिळक स्मारक मंदिर आणि अशा असंख्य संस्थांचा कारभार त्यांनी तळमळीनेच, दूरदृष्टीने आणि कार्यक्षमतेने सांभाळला. महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य टिळक चरित्र साधना समितीवर दीपकजींसह सदस्य म्हणून मला कार्य करण्याची संधी लाभली. यंदाच्या वसंत व्याख्यानमालेतील पहिलेच भाषण माझे होते आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक टिळक होते. लोकमान्यांविषयी बोलताना त्यांच्यासमोर बोलण्याचा तो क्षण माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा होता. त्यांच्या निधनामुळे मला वैयक्तिक दुःख झाले आहेत, पण सार्वजिनक जीवनाचीही मोठी हानी झाली आहे. 

- प्रा. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, विश्वकोष मंडळ

‘लोकमान्यांची शिकवण सदैव जपली’  

पुणे : लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी ’केसरी’च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार व लोकशिक्षण ही लोकमान्यांची शिकवण सदैव जपली, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.
 
’केसरी’च्या विश्वस्त संपादक पदासोबतच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती पद, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी टिळक कुटुंबाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या निधनाने एक कृतिशील विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Related Articles