नरमाई   

धनंजय दीक्षित

दिवाळीमधल्या लक्ष्मी पूजनानंतर जे फटाके वाजतात ते वाजवून संपल्यावर किंवा अगदी घराशेजारून डीजेवाली मोठी मिरवणूक गेल्यानंतर थोडा वेळ कशी सामसूम असते, तसेच काहीसे गेल्या आठवड्यामध्ये बाजाराच्या बाबतीत घडले. मार्च 2025 च्या शेवटी संपलेल्या तिमाहीचे व 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचे सर्व निकाल जाहीर झालेले, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने व्याजदर व सीआरआरमध्ये सढळ हाताने कपात जाहीर केलेली, त्यामुळे बाजार आज मैं उपर - आसमां नीचे या धुंदीत तेजीवर स्वार झाला होता. 
 
परंतु, जगात कुठेही, शेअर बाजार नेहमीच नवनवीन बातम्या-घडामोडी शोधण्याच्या प्रयत्नात असतात व प्रत्येक घडामोडीनंतर भविष्याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करतात आणि त्या अंदाजांवर बाजाराची दिशा ठरते. अशा दोन घटना गुरुवार दुपारी व शुक्रवारी सकाळी घडल्या आणि बाजाराने खालची दिशा पकडली. 
 
गुरुवारी दुपारी अहमदाबाद येथील अत्यंत दुर्दैवी विमान अपघाताची बातमी आली आणि सर्वांनाच सुन्न करून गेली. तिथेच बाजारात चलबिचल सुरु झाली. (अमेरिकन बाजारात बोइंग कंपनीचे शेअर 8 टक्क्यांनी घसरले). शुक्रवारी सकाळी इस्रायलने जाहीर केले की, त्यांनी इराणच्या अणुऊर्जा प्रकल्प, तसेच शस्त्रांच्या कारखान्यांवर हवाई हल्ले केले व हेही सांगितले की, असे हल्ले गरज असेपर्यंत चालू राहतील. आता, मध्यपूर्व आशियामध्ये खुट्ट झाले की, तेलाची किंमत वाढते व त्या प्रमाणेच ती 7 टक्क्यांनी झटक्यात वाढली. त्यामुळे जागतिक शेअर बाजार, तसेच भारतीय शेअर बाजारात मंदीचे वारे वाहू लागले. युद्ध म्हटले की, अनिश्‍चितता आली. अशा वेळेस शेअर बाजारात गुंतवणूकदार -सौदेबाज सावध पवित्रा घेणेच पसंत करतात. 
 
भारतीय बाजारात सुद्धा शेअरच्या किमती बर्‍यापैकी वाढल्या होत्याच, त्या पडायच्या आधी शेअर विकून नफा पदरात पाडण्यासाठी लोक सरसावले, यात नवल काहीच नाही. आणि अर्थातच या त्यांच्या कृतीमुळे विक्रीचा दबाव वाढून शेअरच्या किमती खाली यायचाच होत्या त्या आल्या. आलेख विश्‍लेषकांच्या दृष्टीने, बाजारात पडझड जरी झाली असली तरी 24500 ही निफ्टीची आधार पातळी अजून शाबूत आहे, कारण निफ्टीचा बंद भाव 24718.60 इतका होता. पुढचे काही दिवस बाजारातील अनिश्‍चितता कमी जास्त होत राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे जून तिमाहीचे निकाल जाहीर होऊ लागेपर्यंत कुठलीही एक दिशा बाजारामध्ये दिसून येईल, असे वाटत नाही.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.) 

Related Articles