वियान मुल्डरची नाबाद ३६७ धावांची कामगिरी   

एका कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेल्या २१ वर्षांपासून वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याच्या नावावर आहे. त्यानंतर अनेक खेळाडूंनी ३०० धावांचा टप्पा ओलांडला, परंतु लाराचा विक्रम मोडू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर हा ऐतिहासिक विक्रम मोडू शकला असता, परंतु त्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने डाव घोषित केला. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत आफ्रिकेने ६२६ धावा केल्या. वियानने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामिगरी केली. 
 
दुसर्‍या कसोटीत दुसर्‍या दिवशी लंचब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावून ६२६ धावा केल्या होत्या. वियान मुल्डरने ३६७ धावा केल्या होत्या आणि ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी त्याला ३३ धावांची आवश्यकता होती. पण लंचब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकन संघ पुन्हा खेळायला न येता ६२६ धावांवर पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे वियान मुल्डर स्वत: दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार असल्यामुळे त्याला ४०० धावा करण्याची संधी होती. मात्र त्याने डाव घोषित केल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. 
 
दरम्यान वियान मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. याआधी एका डावात ३११ धावा करणार्‍या दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम आमलाच्या नावावर हा विक्रम होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील वियान मुल्डरचे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे, मुल्डरने २९७ चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. सर्वात जलद त्रिशतकाचा विक्रम भारताच्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे, ज्याने २७८ चेंडूत त्रिशतक पूर्ण केले.
 
वियान मुल्डर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने कसोटी, वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. २०१९ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. २०२१ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-२० पदार्पण केले. झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने कर्णधार म्हणून ३०० धावांचा टप्पा ओलांडला आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला. मुल्डरने २९७ चेंडूंमध्ये त्रिशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात ४९ चौकार आणि ४ षटकार लगावले, असे वृत्त आहे.

Related Articles