सिराजला सामना शुल्काच्या १५ टक्के दंड   

लंडन : लॉर्ड्स येथील तिसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला बाद केल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिल्याबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज महंमद सिराजला सोमवारी त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
 
या कसोटीत चार विकेट घेणार्‍या सिराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळाडू आणि खेळाडूंच्या सहायक कर्मचार्‍यांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या प्रति दाखविलेल्या आक्रमक प्रतिक्रियेशी संबंधित आहे. रविवारी इंग्लंडच्या दुसर्‍या डावात डकेटला १२ धावांवर बाद केल्यानंतर सिराजने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच्या खांद्यावर चेंडूही आदळला.
 
लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय वेगवान गोलंदाज सिराजला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. विकेट घेतल्यानंतर फॉलो-थ्रूमध्ये सिराजने फलंदाजाच्या जवळ जाऊन आनंद साजरा केला. डकेट पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याच्या शरीराला स्पर्शही केला. दंडाव्यतिरिक्त, सिराजच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा दुसरा गुन्हा होता, ज्यामुळे त्याचे डिमेरिट पॉइंट्स दोन झाले.
 
जेव्हा एखादा खेळाडू २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स गाठतो तेव्हा ते निलंबन पॉइंट्समध्ये रूपांतरित होतात आणि खेळाडूवर बंदी घातली जाते.
 

Related Articles