तामिळनाडूत मालगाडीला भीषण आग   

चेन्नई : मनालीहून कर्नाटकला जोलारपेटमार्गे जाणारी डिझेल मालगाडी तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर पाच टँकर वॅगन्सला आग लागली. डिझेलमुळे ही आग १८ टँकर वॅगन्सपर्यंत पसरली. या घटनेमुळे चेन्नई-अरक्कोनम रेल्वेमार्गावरील विद्युत पुरवठा तातडीने बंद करण्यात आला, ज्याचा परिणाम थेट उपनगरी रेल्वे सेवांवर झाला आहे.
 
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही मालगाडी तिरुवल्लूर स्थानकाजवळून जात असताना अचानक ती रूळावरून घसरून एका वॅगनमध्ये आग लागली. ही आग काही वेळातच अन्य डिझेल वॅगन्सपर्यंत पसरली आणि आगीचे लोट व धुराचे गडद वलय परिसरात पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. या आगीत ४ ते १३ टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
जळत्या  रेल्वेपासून ४० टँकर वॅगन्स वेगळे करण्यात आले आहेत. त्याच वेळी, रेल्वे स्थानकाच्या आसपास राहणार्‍या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. मालगाडीला आग लागल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. चेन्नई सेंट्रल येथून सुटणार्‍या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत.

Related Articles