वाचक लिहितात   

क्रिकेटचे ओंगळवाणे स्वरुप
 
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरीची जी घटना घडली, ती दु:खद आहे. तथापि यातून ’आयपीएल’ची उपयुक्तता काय? हा देखील प्रश्न विचारला जावा. ’बीसीसीआय’साठी आयपीएल स्पर्धा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. आयपीएल लढतीच्या प्रसारण हक्कासाठीच्या ई-लिलावाच्या प्रक्रियेतून बीसीसीआय अब्जाधीश आणि क्रिकेटपटूंच्या लिलावातून खेळाडू कोट्यधीश कसे झाले आहेत. भारतीयांची ही मानसिकता अचूक टिपली आहे. सततच्या खेळामुळे खेळाडूंची दमछाक होवो अथवा खेळाडू जायबंदी होवो, शेंडी तुटो वा पारंबी पण, आयपीएल आयोजित केला जातो. आयपीएलमध्ये वाहणारा पैसा आणि या निमित्ताने सरकारलाही मिळणारे भरघोस महसूल उत्पन्न हेही तेवढेच वास्तव आहे. आयपीएल संघाच्या मालकांमध्ये मोठ-मोठे उद्योगपती सहभागी आहेत. त्यामुळे ही केवळ खेळाची स्पर्धा राहिली नसून नवा बिझनेस म्हणून नावारूपाला आली आहे. भारतीयांची क्रिकेट वेडाची ही नस बीसीसीआयने बरोबर ओळखली आहे; पण, शेवटी ज्या खेळाडूंच्या जिवावर ही स्पर्धा आयोजित केली जाते, त्या खेळाडूंच्या जिवाचे; शारीरिक तंदुरुस्तीचे जरादेखील सोयरसुतक बीसीसीआयला राहिलेले नाही. खेळाडूंची आपापसात झुंज लावून संघभावनेपेक्षा ’धन’ भावना वरचढ ठरू लागली आहे. यातून क्रिकेटचा एकूणच पोत दिवसेंदिवस ढासळतो आहे. ’आयपीएल’मधून क्रिकेट खेळाचे स्वरूप बदलून त्यास झुंजीचे ओंगळवाणे रूप प्राप्त झाले आहे.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
शहाणपण कधी येणार?
 
बंगळुरूमध्ये ’आरसीबी’ विजय सोहळ्यात चेंगराचेंगरी होऊन ११ ठार, ४७ जखमी, हे वृत्त (केसरी ५ जून) वाचून तीव्र दुःख झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाचा जल्लोष साजरा झाला खरा; पण त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन ११ निरपराध लोकांना जीवाला मुकावे लागले. या दुर्घटनेमुळे विजयी सोहळ्याला अखेरीस दुःखाचे गालबोट लागलेच. या घटनेवरून काही महिन्यांपूर्वी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन तीस लोकांना प्राणाला मुकावे लागले होते. त्या घटनेची आठवण जागी झाली. जनतेला शहाणपण कधी येणार? हा खरा प्रश्न आहे. या ठिकाणी संतापजनक बाब म्हणजे चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यात आम्ही कसे बरोबर व चूक तुमचीच हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतो. या दुर्घटनेला पोलीस, क्रीडा रसिक अथवा राज्यकर्ते प्रत्येकाची बेजबाबदार वृत्तीच या घटनेला कारणीभूत ठरली आहे.
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
गर्दीचे गलथान व्यवस्थापन
 
क्षमतेपेक्षा अधिक गर्दी उसळली की, त्यांचे नियंत्रण करण्यात प्रशासन अपयशी ठरते, हे बंगळुरूमधील दुर्घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी का पडतो? याचा प्रशासनाने अभ्यास करावा. परदेशात गर्दीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने अधिकार्‍यांना परदेशात पाठवावे. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत. विशेषतः तरुणांना उत्सवात सहभागी होण्याची फार हौस असते, याच हौसेतून गर्दी वाढत जाते आणि अशी दुर्घटना घडते. नागरिकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची नितांत गरज आहे. आपल्या जिवापेक्षा मोठे काहीही नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
एक अभियांत्रिकी चमत्कार!
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे उद्घाटन करून तो नुकताच राष्ट्राला अर्पण केला. भारताच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा ठरलेला चिनाबचा पूल एक अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक, अंतर २७२ किमी या प्रकल्पाचा एक भाग असलेला आणि रियासी जिल्ह्यातील कौरी प्रदेशात चिनाब नदीवर बांधण्यात आलेला हा पूल नदीच्या पात्रापासून तब्बल ११७७ फूट (३५९ मीटर) उंचीवर उभा आहे. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही या पुलाची उंची (१०८३ फूट-३३० मीटर) अधिक आहे. यावरून त्याची भव्यता लक्षात येते. हिमालयाच्या पर्वतीय भूभागात २६० किमी प्रतितास वेगाने वाहणार्‍या वार्‍यांना तोंड देण्यासाठी तसेच सर्वात जास्त तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांना सहन करण्यासाठी या पुलावर १३१५ फूट (४०१ मीटर) लांबीची स्टील आणि काँक्रिट वापरून बनवलेली एक भव्य कमान आहे. हिमालयातील खडबडीत भूभाग, लहरी आणि घातक हवामान परिस्थिती, पहाड आणि जागेची दुर्गमता अशा आव्हानात्मक परिस्थितीत सर्व अडथळ्यांवर मात करून इतक्या उंचीवर बांधकाम साहित्य आणि संबंधित यंत्रसामुग्री नेऊन बांधलेला हा पूल मानवी कल्पकतेचा, इच्छाशक्तीचा आणि अथक प्रयत्नांचा अविष्कार म्हणावा लागेल.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   
 
महामार्गाचा विस्तार पुरेसा नाही!
 
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई - पुणे हा सर्वात वर्दळी मार्गाचा विस्तार करून तो सहापदरांवरून दहा पदरी करण्याचा एमएसआरडीसीने मांडलेला प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. दररोज अंदाजे 65000 वाहनांची वर्दळ, सुट्ट्यांच्या दिवशी एक लाखांपर्यंत जाते. त्याला सामोरे जाण्यासाठी चार लेन्स वाढवून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करतांना दरवर्षी वाढत्या वाहनांच्या संख्येचा विचार लक्षात घेतला आहे, हा दूरदर्शी निर्णय आवश्यक होता. वास्तविक कोठल्याही महामार्गांची फक्त रुंदी ( लेन्स ) वाढवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकणार नाही. लहान - मोठ्या शहरांतून येणारे रस्ते जेव्हा वाहनांना महामार्गांवर आणून सोडतात त्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. एकाचवेळी आलेली वाहने महामार्गांवर सुरुवातीचा टप्पा वाहतुकीची कोंडी जरी दर्शवित असला, तरी त्यापुढील टप्प्यांत होणारी वाहतुकीची कोंडी ही महामार्गांच्या मार्गिका किंवा लेन्समुळे होत नसून ती वाहनचालकांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे होत असते हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. 
 
जड/अवजड मालवाहतूक करणारी वाहने महामार्गांवर आखून दिलेल्या मार्गिकांमधून मार्गक्रमण करण्यात बहुतेक वेळा टाळाटाळ करतात विशेषतः चढण असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करतांना हे नजरेस पडते. त्यामुळे मागील वाहनांना त्यांची गती मंदावणे भाग पडते तिथेही वाहतूक कोंडी अनुभवावयास मिळते. बाजारात आलेली नवी वाहने आखून दिलेल्या मर्यादांपेक्षा अधिक वेगाने चालविली जातात. त्यांवर नियंत्रण राखणारी यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवली जाणे व कोठल्याही नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे अपघात टाळता येतील. सर्वच वाहनांची स्थिती, चालकांची, प्रवाशांची शारीरिक क्षमता, वये विचारात घेऊन वाहने चालविण्याचा शक्यतो विचार केला जातो. म्हणूनच महामार्गांवर होणार्‍या वाहतूक कोंडीस निव्वळ मार्गिकांच्या रुंदीचा विस्तार करून येणार्‍या समस्यांवर मात करणे सहज शक्य होणार नाही. महामार्गांना जोडणार्‍या सर्वसाधारण वाहन चालकांनी आणि प्रवासी वाहतूक करणार्‍या बस चालकांनी गती राखतांना ओव्हरटेक करतेवेळी मागील पुढील वाहनांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत शक्यतो हॉर्न्स वाजविणे टाळलेले बरे. 
 
रस्त्यांची रुंदी कितीही वाढविली तरी वाहनचालकांनी मार्गिका आणि वाहनाचा वेग पाळणे आवश्यक आहे. तेवढेच सर्व वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून पाळत ठेवण्याची कामगिरी वाहतूक नियंत्रण कक्षेने केवळ दंडात्मक कारवाईचा बडगा न उगारता शिस्त लावण्याच्या दृष्टीने पार पाडावा अशा अपेक्षा आहेत. महामार्गांचा विस्तार करतांना या सर्व बाबींचा विचार केल्यास त्या विस्ताराला विशेष महत्त्व प्राप्त होईल. 
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.

Related Articles