‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर   

ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी ‘वन बिग ब्युटीफूल’ विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. कर कपात आणि प्रशासकीय खर्चातील बचतीसंदर्भात असलेल्या या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली.  
 
अमेरिकेच्या २४९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्हाइट हाऊसच्या लॉनमध्ये विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात खासदार, प्रशासकीय अधिकारी आणि विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रम्प यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता वैद्यकीय सुविधांमध्ये मिळणार्‍या सवलतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाईल. तर, सीमा सुरक्षा, लष्कर तसेच अनधिकृत नागरिकांच्या सामूहिक हद्दपारीसाठी निधी वाढविला जाईल.
 
या विधेयकाला डेमोक्रॅटसनी कडवा विरोध केला असला तरी रिपब्लिकन पक्षाचा त्यांना दमदार पाठिंबा मिळाला. ८६९ पानांचे हे विधेयक आधी सिनेटमध्ये ५१ विरुद्ध ५० मतांनी मंजूर करण्यात आले होते. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी निर्णायक मत दिले होते. त्यानंतर ३ जुलै रोजी अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहामध्ये हे विधेयक २१८ विरुद्ध २१४ मतांनी मंजूर झाले होते आणि त्यानंतर ते स्वाक्षरीसाठी ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले होते.  
 
दरम्यान, बिग ब्युटिफूल बिल मंजूर झाल्यानंतर याचा जनभावनेचा आगामी निवडणुकीत लाभ घेण्यासाठी विरोधीपक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. 
 

Related Articles