इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच   

जकार्ता : इंडोनेशियातील बाली या पर्यटन बेटावर बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या ३० जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा पूर्व जावामधील केतापांग बंदर सोडल्यानंतर ’केएमपी तुनु प्रतामा जया’ ही बोट बुडाली. ही बोट बालीच्या गिलिमानुक बंदराकडे जात होती.गुरुवारी संध्याकाळी दृश्यमानतेच्या समस्येमुळे शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पोलिस आणि सैनिकांसह १६० हून अधिक बचावकर्त्यांच्या मदतीने ते पुन्हा सुरू करण्यात आले. तीन हेलिकॉप्टर, एक ड्रोन आणि जवळपास २० जहाजांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव एजन्सीचे उपप्रमुख रिबुट इको सुयात्नो यांनी सांगितले.
 
सुयात्नो म्हणाले की, हवामान अंदाजानुसार शुक्रवारी बाली सामुद्रधुनीभोवती उंच लाटा आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे लहान बोटींऐवजी नौदलाची तीन जहाजे तैनात करण्यात आली आहेत.गुरुवारी रात्री उशिरा एजन्सीने सुटका केलेल्या २९ जणांची नावे जाहीर केली आणि सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. बेपत्ता झालेल्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत; परंतु प्रवाशांच्या यादीनुसार ३० लोक बेपत्ता होते.

Related Articles