माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड   

बारामती, (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने जोरदार विजय मिळवला. त्यानंतर शनिवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी अजित पवार यांची, तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांनी अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी निळकंठेश्वर पॅनलने तब्बल २० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून केवळ चंद्रराव तावरे यांना यश मिळाले. माळेगाव कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी बैठक झाली. अध्यक्षपदासाठी अजित पवार व उपाध्यक्षपदासाठी संगीता कोकरे यांचे एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
 
या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात छत्रपती कारखान्याच्या संचालकपदापासून केली होती. आता माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी पुन्हा सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवारांनी, माळेगाव कारखान्याचा चेहरामोहरा पुढील पाच वर्षांत बदलून दाखवू, असा निर्धार व्यक्त करत नव्या यशाचा संकल्प केला.

Related Articles