‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता   

लष्कराने केले स्पष्ट 

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने तीन देशांशी सामना केला. चीन पाकिस्तानला भारतीय लष्कराचे लाइव्ह अपडेट देत होता.  पाकिस्तानच्या ८१ टक्के लष्करी साठ्यांत चीनकडून मिळालेली उपकरणे होती. तर तुर्कीकडून पाकिस्तानला ड्रोन पुरविण्यात आले होते. भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
   
सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या चार दिवसांच्या संघर्षात भारत एका सीमारेषेवर लढत होता; पण प्रत्यक्षात तीन शत्रूंशी झुंज चालू होती. पाकिस्तानच्या पाठीशी चीन आणि तुर्कस्तानचा हात होता. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. चीनसाठी भारत-पाकिस्तान संघर्ष एका प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा होता. चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात होती. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मागच्या पाच वर्षांत पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांवर नजर टाकली तर त्यातील ८१ टक्के चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आहेत. तुर्कस्तानकडून पाकिस्तानला ड्रोन पुरवण्यात आले होते, जे भारतीय शहरांवर आणि सैनिकी ठिकाणांवर हल्ल्यासाठी वापरण्यात आले.
     
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने २१ लक्ष्यांची यादी तयार केली होती, त्यापैकी ९ ठिकाणांवर  निःपक्षपातीपणे हल्ला करण्याचा निर्णय अंतिम दिवशी घेतला गेला. ही कारवाई एकत्रितपणे तीनही लष्करी दलांनी केली. जेणेकरून भारताचे एकात्मिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन होईल.सैन्य कारवाई सुरू केल्यावर, उद्दिष्ट साध्य झाल्यावर ती वेळेत थांबवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच हे युद्ध योग्य वेळी थांबवणे हे एक उत्कृष्ट धोरणात्मक पाऊल होते, असेही ते म्हणाले.

Related Articles