बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी   

पीएमआरडीएकडून तीन कोटींच्या निधीची घोषणा

भोर, (वार्ताहर) : नसरापूर वेल्हे मार्गावरील बनेश्वर देवस्थानकडे जाणा-या रस्त्याच्या कामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.पीएमआरडीएकडून ७५० मीटर रस्त्यासाठी दोन कोटी ९४ लाख ३६ हजारांचा निधी देण्यात येणार आहे. पीएमआरडीएचे उपायुक्त संभाजी पाटील,सहाय्यक अभियंता जयेश बदाने यांनी घटनास्थळी भेट देउन कामाची पाहणी केल्यानंतर ही माहीती दिली.यावेळी सरपंच उषा कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण, इरफान मुलाणी,हनुमंत कदम,अनिल गयावळ, काशिनाथ पालकर, लहूनाना शेलार, ज्ञानेश्वर झोरे आदी उपस्थित होते. हा रस्ता करण्या साठी माजी आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सुळे यांनी कार्यकर्त्यांसह लाक्षणिक उपोषण केले होते. मे महिन्यात स्थानिकांनी आक्रमक होत आंदोलन केले. पावसाळ्यापूर्वी काम सुरू केले नाही, तर पुणे सातारा महामार्ग रोखून धरण्याचा सरकारला इशारा दिला होता. सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पीएमआरडीएने कामाची जबाबदारी घेतली. त्यानुसार कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. रस्त्याच्या नदीच्या बाजूची जुनी संरक्षक भिंत पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ता सिंमेट कॉक्रींटचा करण्यात येणार आहे.
 
असे होणार काम
 
७५० मीटर लांबीच्या रस्त्यावर साडेपाच मीटर रूंदीचे सिमेंट कॉक्रीट करणार. रस्त्याच्या डाव्या बाजूचे पाणी नदीमध्ये वाहून जाण्यासाठी तीन ठिकाणी तीन फूटांची पाईप बसवणार असून, पाणी वाहून जाण्यासाठी दोन फूटांची दहा पाईप टाकण्यात येणार आहे. नदीच्या बाजूची संरक्षक भिंत २५० मीटर लांब बांधणार आहे. माती व पाणी येऊ नये म्हणून उजव्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. कामाची कालावधी १० महिने आहे. पुढील आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. 

Related Articles