बाजाराला अर्थप्रवाहाने चालना   

हेमंत देसाई, जेष्ठ पत्रकार 

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे अनेक बँकांनी अलिकडेच व्याजाचे दर अर्धा टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. उद्योगपतींच्या दृष्टीने ही आनंदवार्ता ठरत असताना महसूल आणि नफ्यात विशेष वाढ झाली नसतानाही काही कंपन्यांनी भागधारकांना भरभरून लाभांश दिला असल्याची माहिती पुढे आली. शेअर बाजार अनेकांना गुंतागुंतीचा वाटू शकतो, त्यात संख्या, चार्ट आणि भीतीदायक वाटणार्‍या संज्ञा भरलेल्या असतात. असाच एक शब्द म्हणजे लाभांश उत्पन्न गुणोत्तर. ते गुंतागुंतीचे वाटत असेल, तर काळजी करू नका! शेअर्सच्या मालकीवरून तुम्ही किती पैसे कमवू शकता हे स्पष्ट करणारा ‘डिव्हिडंड यील्ड रेशो’ कंपनीने दिलेल्या लाभांशाच्या आधारावर मोजले जाते. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. 
 
काही कंपन्या गुंतवणूक केल्याबद्दल बक्षीस म्हणून भागधारकासोबत या लाभांशाच्या रुपात ही एक छोटी रक्कम शेअर करत असतात. सर्व कंपन्या लाभांश देत नाहीत; परंतु त्या दर काही महिन्यांनी भागधारकांना हे पैसे पाठवतात. ‘डिव्हिडंड यील्ड रेशो’ तुम्हाला सांगतो की तुम्ही स्टॉकसाठी दिलेल्या किमतीच्या तुलनेत तुम्हाला किती डिव्हिडंड मिळतो. ते टक्केवारी म्हणून दाखवले जाते. त्यामुळे तुम्हाला डिव्हिडंडमधून किती परतावा मिळत आहे हे समजणे सोपे होते. एखादा स्टॉक खरेदी केला तर मिळणारा ‘डिव्हिडंड यील्ड रेशो’ हा एका रिपोर्ट कार्डसारखा असतो. तो दाखवतो की स्टॉक तुम्हाला त्याच्या किमतीच्या तुलनेत दर वर्षी किती ‘अतिरिक्त रोख’ देतो. ‘डिव्हिडंड यील्ड रेशो’ निवडलेला स्टॉक चांगली गुंतवणूक आहे की नाही, हे ठरवण्यास मदत करतो. स्टॉकवर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी तुम्हाला डिव्हिडंडमधून किती उत्पन्न मिळू शकते हे त्यातून दिसते. तुम्ही नियमित उत्पन्न देणारे स्टॉक शोधत असाल तर हे विशेषतः उपयुक्त ठरते. लाभांश म्हणजे नफ्याचा वाटा. कंपन्या संपूर्ण आर्थिक वर्षात मिळवलेल्या नफ्यातील काही भाग आपल्या भागधारकांना लाभांश म्हणून वितरित करतात.
 
लाभांशाची घोषणा
 
२०२५ मध्ये अशा वीसहून अधिक कंपन्या उदयास आल्या आहेत, ज्यांनी तोटा सहन करूनही भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केलेी. रंजक बाब अशी की, या कंपन्यांमधील प्रवर्तकांचा हिस्सा ३३ ते ७५ टक्के आहे. म्हणजेच कंपनी तोट्यात असूनही या कंपन्यांच्या प्रवर्तकांना कोट्यवधी रुपयांचा लाभांश मिळणार आहे. भारतीय कंपनी कायद्यानुसार केवळ चालू वर्षाच्या नफ्यातून लाभांश दिला जाऊ शकतो; परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मागील वर्षांच्या राखीव निधीतूनही लाभांश वितरित केला जाऊ शकतो. किमान २२ कंपन्या अशा आहेत, ज्यांनी स्वतंत्र निव्वळ तोटा असूनही लाभांश जाहीर केला आहे. यापैकी अनेक कंपन्यांनी, त्यांच्या उपकंपन्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे एकत्रित पातळीवर नफा नोंदवला होता. तथापि, कायद्यानुसार केवळ स्वतंत्र निकालांच्या आधारे लाभांश जाहीर केला जाऊ शकतो. परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, मागील वर्षांच्या राखीव निधीतूनदेखील लाभांश वितरित केला जाऊ शकतो.अशा परिस्थितीमध्ये कंपन्या या नियमाचा फायदा घेत लाभांश वितरित करत आहेत. असाच काहीसा फायदा उद्योग विश्व ताज्या पतधोरणामुळे अनुभवू शकते. कारण, रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात अर्धा टक्का व्याजकपातीचा निर्णय जाहीर करून उद्योगपतींना खूश केले आहे. सलग तिसर्‍यांदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. शिवाय सीआरआर किंवा रोख राखीव निधीचे प्रमाणही एक टक्क्याने कमी करून दर तीन टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
 
बँकांना आपल्याकडील रोखतेचा काही वाटा रिझर्व्ह बँकेत ठेवावा लागतो, त्याला सीआरआर असे म्हणतात. तो कमी केल्यामुळे बँकांच्या हाताशी आता जास्त निधी उपलब्ध असणार आहे. हा सर्व निधी आता कर्जपुरवठ्यासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे आता पतक्षमता असणार्‍या व्यापारी आणि उद्योजकांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे भरपूर निधी उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेने  रेपो दरात सणसणीत कपात केल्यामुळे अनेक बँकांनी व्याजाचे दर तेवढ्याच प्रमाणात, म्हणजे अर्धा टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली आहे. उद्योगपतींच्या दृष्टीने ही आनंदवार्ताच म्हणावी लागेल. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक यांनी रेपो दराशी संलग्न कर्ज ५० आधार बिंदूंनी, अर्थात अर्धा टक्क्याने घटवले असून त्यांचे या प्रकारातील व्याजाचे दर हे आता ८.१५ टक्के आणि ८.३५ टक्के या पातळीवर आले आहेत. बँक ऑफ इंडियाचे ८.८५ टक्क्यांऐवजी ८.३५ टक्के असे सुधारित व्याजदर आता रेपो दराच्या संलग्न कर्जासाठी लागू असतील. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने त्यांच्या निधी आधारित कर्जांच्या दरात कालावधीनुसार दहा आधारबिंदूंची कपात केली आहे. या मानदंडाशी निगडित असलेल्या कर्जदारांना याचा शंभर टक्के फायदा होणार आहे. निधीआधारित कर्जदर दहा आधारबिंदूंनी कमी करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सीआरआर कमी केल्यामुळे बँकांना कर्जवितरणासाठी अडीच लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. 
 
शेअर बाजारात तेजी
 
दरम्यान, अमेरिका आणि चीनमधील व्यापार चर्चेच्या नवीन फेरीबद्दलच्या आशावादाने मुंबई शेअर बाजारातील तेजीच्या उत्साहाला खतपाणी घातले. मुख्यतः कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, इंड्सइंड बँक, बजाज फिन्सर्व्ह, आयसीआयसीआय बँक या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील बँकांचे आणि कंपन्यांचे भाव वाढले. देशातील लिस्टेड किंवा सूचीबद्ध कंपन्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशामुळे अगोदरच भागधारकांचे खिसे फुगले आहेत. 
 
भारतातील सूचीबद्ध कंपन्यांनी मागच्या आर्थिक वर्षात १६ लाख कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. त्याच्या अगोदरच्या वर्षातील नफा १५ लाख कोटी रुपयांच्या आसपास होता. नफ्यात पाच टक्क्यांच्या आसपास वृद्धी झाली होती. कंपन्यांच्या एकत्रित विक्री महसुलात साडेसात टक्के वाढ होऊन, तो १६६ लाख कोटी रुपये झाला. कंपन्यांच्या विक्रीतील वाढ प्रचंड नसली, तरी सातत्यपूर्ण आहे. परंतु, ती लाभांशामध्ये वाढ करण्याएवढी नव्हती, हे स्पष्ट आहे. महसूल आणि नफ्यात विशेष वाढ झाली नसतानाही कंपन्यांनी भागधारकांना भरभरून लाभांश दिला असल्याची माहिती एंजल वन या दलाली पिढीने आपल्या अहवालात दिली आहे. २०२३-२४ मध्ये कंपन्यांनी ४ लाख ५२ हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला. उलट, २०२४-२५ मध्ये कंपन्यांनी लाभांशापोटी वितरित केलेली रक्कम ही पाच लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.
 
सकारात्मक संकेत
 
लाभांश अनेक मार्गांनी शेअरच्या किमतीवर परिणाम करू शकतो. लाभांश जाहीर करणे किंवा वाढवणे गुंतवणूकदारांना सकारात्मक संकेत देते. लाभांश कंपनीच्या नफा आणि भविष्यातील संभाव्यतेवर विश्वास दर्शवतो. त्यामुळे स्टॉकची मागणी वाढू शकते आणि शेअरच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारदेखील आकर्षित होऊ शकतात. विशेषतः उत्पन्नासाठी नियमित लाभांशावर अवलंबून असणार्‍या गुंतवणूकदारांचे या लाभांशाकडे लक्ष असते. सातत्यपूर्ण आणि आकर्षक लाभांश गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत असतो. शेअरच्या किमतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. याव्यतिरिक्त, बाजारातील इतर स्टॉकच्या तुलनेत लाभांश कॅप्चर धोरणे, लाभांश पुनर्गुंतवणूक आणि लाभांश उत्पन्नदेखील स्टॉकच्या किमतींवर प्रभाव टाकू शकतात. ही बाब लक्षात घेऊन कंपन्यांनी त्यांच्या नफ्यावर आधारित लाभांशाचे सूत्र ठेवले पाहिजे; परंतु हे सूत्र बाजूला ठेवत कंपन्यांनी लाभांश देण्यात अनेक कारणे आहेत.
 
जास्त रोकड गंगाजळी असल्याने कंपन्यांना भागधारकांना अगोदरइतका लाभांश कायम ठेवणे किंवा त्यात वाढ करणे शक्य झाले आहे. शिवाय याची दुसरी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे कंपन्यांचे प्रवर्तक हेच सर्वात मोठे भागधारक असल्याने चढा लाभांश देऊन त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आहे. वास्तविक, नफ्याच्या प्रमाणातच लाभांश देणे योग्य ठरते. शिवाय काही रक्कम लाभांश म्हणून देण्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजूला काढणे श्रेयस्कर असते. परंतु ज्यादा लाभांश देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणे आणि गुंतवणूकदारांना खुश करणे हे सवंग अर्थकारण खाजगी क्षेत्रही करत असते. सार्वजनिक उपक्रमांना तसेच कंपन्यांना लक्ष्य करणार्‍या अर्थतज्ज्ञांनी या वास्तवाकडेही जरूर लक्ष दिले पाहिजे.

Related Articles