‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर   

पुण्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील तनय गाडगीळ, सिद्धांत पाटणकर, ध्रुव नातू आणि अनुज पगार यांनी १०० पर्सेंटाईल पटकाविले आहेत. राज्यातील जवळपास चार लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर तब्बल २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. 
 
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम गट) ही परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान झाली. त्यातील अतिरिक्त परीक्षा पाच मे रोजी घेण्यात आली. राज्यातील २०७ केंद्रांवर आणि महाराष्ट्राबाहेरील १७ केंद्रांवर ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी चार लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील चार लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी (९१.०४ टक्के) परीक्षा दिली. सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी गट)’ ही परीक्षा घेण्यात आली. पीसीबी गटाचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Related Articles