तोपर्यंत शेतकर्‍यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार   

रघुनाथ पाटील यांनी घेतली सभापती, सचिवांची भेट 

पुणे : बाजार समिती शेतकर्‍यांसाठी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शेतकर्‍यांना दोन पैसे अधिकचे मिळतील, त्या ठिकाणी त्यांना लिंबाची विक्री करू द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिवांकडे शुक्रवारी केली. 
 
रघुनाथ पाटील यांनी शेतकर्‍यांसह काल बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर व सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांची भेट घेतली. या भेटीत शासनाने जाहीर केलेल्या यादीत लिंबाचा समावेश फळांच्या वर्गवारीत करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात लिंबाची विक्री भाजीपाला विभागात न करता फळ विभागात करावी. असा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असल्याची भूमिका दिलीप काळभोर आणि डॉ. राजाराम धोंडकर यांनी मांडली. तर लिंबू हे फळ नसून भाजीचाच प्रकार आहे. त्यामुळे लिंबाचा समावेश भाज्यांच्या यादीत करण्यात यावा, अशी भूमिका रघुनाथ पाटील यांनी मांडली. 
 
शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत लिंबाचा समावेश फळांच्या यादीत असल्यामुळे बाजार समिती स्तरावर त्यात बदल करता येणार नाही, तर शासन स्तरावर तशी मागणी करावी लागेल. अशी सूचना डॉ. राजाराम धोंडकर यांनी केली. 
 
शेतकर्‍यांना आडत्यांकडे लिंबे पाठविता येतील
 
शासनाने प्रसिदध केलेल्या लिंबू हे फळात आहे. मात्र लिंबू हे भाजीपाला वर्गवारीत यायला हवे, असे मत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडले.  भाज्यांच्या वर्गवारीत लिंबाचा समावेश व्हावा, यासाठी शासन स्तरावर मागणी करता येईल, अशी सूचना यावेळी करण्यात आली. मात्र तोपर्यंत ज्या शेतकर्‍यांना भाजीपाला विभागातील आडत्यांकडे लिंबे विक्रीला पाठवायची आहेत. त्यांना ती पाठविता येतील. केवळ आडत्यांना लिंबाची विक्री करता येईल, डमीला करता येणार नाही. 
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे 
 
भाजीपाला विभागात लिंबाची विक्री 
 
लिंबू हे फळ नसून भाजीचाच प्रकार आहे. कारण फळांच्या गाड्यांवर किंवा फळांच्या दुकानात लिंबाची विक्री होत नाही, तर ती भाजीच्याच दुकानात होते. अशी भूमिका बाजार समिती सभापती आणि सचिवासोबतच्या चर्चेत मांडली. त्यानंतर पणन संचालकांकडून लिंबू हे फळ की भाजी याबाबत मार्गदर्शन मागविण्याचे ठरले. तोपर्यंत मात्र शेतकरी भाजीपाला विभागात लिंबू पाठवतील. तेथे लिंबाची विक्री होईल, असे चर्चेत ठरले. 
- रधुनाथ पाटील, शेतकरी नेते 

Related Articles