माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी दिघीतील पालखी मार्गावर मॅगझीन चौकात पदपथावर स्वागत मंडप उभारण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी रस्त्याऐवजी पदपथावर स्वागत मंडपास उभारण्यास परवानगी दिली जाणार असल्याने पालखीसाठी रस्ता अधिक प्रमाणात मोकळा राहणार आहे. त्यामुळे, चौकात पालखीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय कमी होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिघीतील आळंदी-पुणे पालखी मार्गवरून शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे पालखी आणि दिंडीप्रमुखांचे स्वागत करण्यात येणार आहे.
 
यासाठी महापालिकेने दिघीतील मॅगझीन चौकात स्वागत कक्ष उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे. याठिकाणी मुख्य स्वागत मंडप ४० फूट लांब, १२ फूट रुंद आणि १६ फूट उंचीचा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संतपीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी अभंगांसह संत विचार मांडणार आहेत. त्यासाठी महापालिकेद्वारे स्वागत मंडपाशेजारी स्वतंत्र मंडप उभारण्यात येत आहे.
 
वारकर्‍यांच्या सोयीसाठी उपाययोजना
 
महापालिकेद्वारे पालखी मार्गावरील रुग्णालयांना वारकर्‍यांच्या तातडीच्या उपचारांसाठी काही खाटा राखीव ठेवत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे यांनी दिली. मॅगझीन चौकात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनही सज्ज ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांबरोबरच महापालिकेचे सुरक्षा कर्मचारीही तैनात राहणार आहेत.
 
मार्गावरच दिंडी प्रमुखांचे स्वागत
 
दरवर्षी महापालिकेद्वारे दिंडी प्रमुखांचे स्वागत मंडपात केले जायचे. मात्र स्वागत मंडपाची उंची अधिक असल्याने विणेकरी, दिंडी प्रमुख यांना स्वागत मंडपात पायर्‍या चढून येण्यासाठी अधिक वेळ लागायचा. त्यामुळे त्यांची दिंडी पुढे जात असल्याने दिंडीत विस्कळीतपणा येत होता. 
 
हे टाळण्यासाठी महापालिकेने दिंडी प्रमुखांचे स्वागत मंडपात न करता पालखी मार्गावरच करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी स्वागत मंडपात न बसता पालखी मार्गावर उभे राहणार आहेत. त्यामुळे पालखीची वेळ वाचणार आहे. त्याचप्रमाणे दिंडीमध्ये विस्कळीतपणाही येणार नाही.

Related Articles