पुण्यातील सराईत गुन्हेगार   

शाहरुख शेख पोलिस चकमकीत ठार  

सोलापूर, (प्रतिनिधी) : पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य आणि सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २९, रा. गल्ली नं. २३/ए, सय्यद नगर, हडपसर, पुणे) हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे शनिवारी मध्यरात्री उशिरा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि युनिट ६ च्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
शाहरुख हा काही दिवसांपासून लांबोटी गावातील नातेवाईकांकडे लपून बसला होता. शेख याच्यावर पुणे शहर व परिसरातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, शस्त्र बाळगणे, आणि दहशत निर्माण करणारे प्रकार यांचा समावेश आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि तो त्या गुन्ह्यात फरार होता.
 
पुणे क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीनुसार शेख सध्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावातील चंदन नगर येथील नातेवाईकांकडे लपून बसल्याचे समजले. या माहितीनुसार पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री लांबोटी येथे संयुक्त कारवाई केली. गुन्हेगार शेख याला अटक करण्यासाठी पोलीस पुढे सरसावले असता, त्याने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला, यात शेख गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
शाहरुख हा पुणे शहरातील टिपू पठाण टोळीचा मुख्य सदस्य होता. ही टोळी पुण्यात खंडणी व दहशतीसाठी कुप्रसिद्ध आहे. शाहरुखच्या मृत्यूनंतर पुण्यातील स्थानिक नागरिकांनी सुटतेचा श्वास घेतला असून पोलिसांची ही कारवाई  गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. पोलीस मागील काही दिवसापासून पोलीस शाहरुखच्या शोधात होते.दरम्यान शाहरुख ठार झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सकाळी लांबोटी गावात जाऊन घटनास्थळाला भेट दिली. या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles