इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची   

तेहरान : जर इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवले तर आम्हीही प्रत्युत्तराची कारवाई थांबवू, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी रविवारी सांगितले. इस्रायलकडून अद्याप याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 
 
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता राजनैतिक प्रयत्न तीव्र झाले आहेत. इराणच्या राजदूताने स्पष्टपणे सूचित केले आहे की, जर इस्रायलने हल्ले थांबवले तर इराण देखील प्रत्युत्तर देणे थांबवेल. दरम्यान,   इराणने ओमान आणि कतारला वॉशिंग्टनशी अणु चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि इस्रायली हल्ले थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे.
 
सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. शनिवारी रात्री दोन्ही देशांनी पुन्हा एकमेकांना लक्ष्य केले. इस्रायलने इराणच्या गॅस फील्ड साइटवर हल्ला केला आहे. हे जगातील सर्वात मोठे गॅस क्षेत्र आहे. इस्रायलच्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे गॅस क्षेत्राच्या जागेला आग लागली आणि उत्पादन थांबवण्यात आले आहे. इस्रायलने आणखी अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणमध्ये आतापर्यंत १३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
दुसरीकडे, इराणने काल रात्री ५० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यातील काही क्षेपणास्त्रांनी लक्ष्य गाठले आहे. इस्रायलमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणला थांबण्याची धमकी दिली आहे, अन्यथा ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात आपण इराणमध्ये मोठा विनाश घडवून आणू, असे त्यांनी म्हटले आहे.
 

Related Articles