‘शेतकर्‍यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’   

पुणे : शेतकर्‍यांनी शेतीकडे दोन वेळेसच्या जेवणाचे साधन म्हणून न पाहता उद्योग म्हणून पहावे. आपल्या शेतीमध्ये तेच पिकवावे ज्यामधून शेतकर्‍याला आर्थिक फायदा होईल. असे उद्गार कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ९ ते १३ जून रोजी आयोजित कृषीमाल निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मांढरे बोलत होते. देशाला १९६० ते ७० कालावधीत अन्नधान्य उत्पादनाची गरज जगण्यासाठी होती.  १९६० च्या कालावधीत देशात जेवढे अन्नधान्याचे उत्पादन होत होते, तेवढे उत्पादन आता महाराष्ट्र राज्यात होत आहे. त्यामुळे आपली कृषी मालाच्या उत्पादनाची गरज लोकांच्या फक्त अन्नासाठीची नसून कृषी मालाची निर्यात करून अधिकाधिक अर्थाजन करण्याची आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, शेतकर्‍यांच्या खाजगी कंपन्या असून यांचेमार्फत शेतकर्‍यांनी निर्यातीमध्ये उतरावे आणि विक्री व्यवस्थेमधून मिळणारा जादाचा नफा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावा असेही मांढरे म्हणाले. 
 
मांढरे पुढे म्हणाले, राज्यातील शेतकरी अद्यापही ट्रेसिबिलिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये कमी पडतो. यामुळे परदेशी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे अवघड होते. दृष्टीला लगेच मान्य होईल अशा पॅकिंग मध्ये कृषीमाल ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास मागणी निश्चित वाढेल आणि याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. प्रमाणीकरण ही भविष्यातील बाजारपेठेची गरज असून शेतकर्‍यांनी यासाठी जागृत रहावे. जगात सर्वत्र भारतीय लोक आहेत. 
 
भारतीय लोकांमुळे परदेशात भारतीय मालाची मागणी वाढू शकते. तसेच परदेशातील भारतीय लोकांनाच आयातदार म्हणून कार्यरत केल्यास आपल्या मालास मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. विविध देशांमध्ये भारतीय आणि महाराष्ट्र मंडळ आहेत. या मंडळाना आयातदार म्हणून पुढे आणल्यास व्यापार अधिक सुलभ होईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी मालाच्या मूल्यवृद्धीमध्ये काम करणे आवश्यक आहे तसेच ई प्लॅटफॉर्म, ऑनलाइन ट्रेडिंग यामध्ये आपली उत्पादने नोंदणीकृत करावीत. बाजारपेठेचे सर्व मार्ग वापरावेत. शेतकर्‍यांनी कृषी मालाचे मार्केटिंग करताना आपली मनोभूमिका बदलावी. ’चलता है’ बंद करून मूल्यवृद्धी, आकर्षक पॅकिंग व उत्कृष्ट दर्जा यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे मांढरे यांनी सांगितले.

Related Articles