वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांविरोधात थेट तक्रार करता येणार   

पुणे : वाहतूकीचे नियम न पाळणार्‍यांविरोधात आता नागरिकदेखील मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे तक्रार करू शकणार आहेत. पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल अ‍ॅपद्वारे वाहतूक नियम मोडणार्‍या चालकांविरोधात थेट तक्रार करता येणार असून, त्याची पडताळणी करून वाहतूक पोलिसांकडून ४८ तासांत कारवाई केली जाणार आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवनात या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. वाहतूककोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक पोलिसांकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
 
अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिक हे बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र आणि माहिती पोलिसांकडे पाठवू शकतात. पदपथावर उभ्या असलेल्या किंवा चालविल्या जाणार्‍या वाहनांची माहिती, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाइल वापरणे, फॅन्सी वाहन क्रमांक, काळी फिल्म लावलेली वाहने अशा प्रकारच्या नियमभंगाबाबत नागरिक तक्रार करू शकतील. तक्रार मिळाल्यानंतर ४८ तासांत पडताळणी करून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्याची ओळख उघड न करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच, वाहतूककोंडी रोखण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून अपघात, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यात पाणी साचणे, झाड कोसळणे, वाहन बिघडणे, बेवारस वाहन याबाबतची माहिती नागरिक देऊ शकणार आहेत.

Related Articles