पाकिस्तानमध्ये बस अपघातात पाच ठार   

कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन भागात गुरुवारी एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर २७ जण जखमी झाले. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बोलन-क्वेट्टा महामार्गावरील हाजी शहराजवळ गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.
 
सादिकाबादहून क्वेट्टाला जाणारी प्रवासी बस डोंगराळ भागात एका तीव्र वळणावर अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दरीत कोसळली. जवळच तैनात असलेल्या निमलष्करी दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. काही वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून  बोलन येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. चार जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत २७ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काहीजण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या आकडेवारीनुसार, बलुचिस्तान प्रांतात अपघातांचे सर्वाधिक प्रमाण आहे. २०२४ मध्ये प्रांताच्या विविध भागांत  जवळपास २० हजार अपघात झाले. या अपघातांमुळे त्या प्रांतातील महामार्गांवर  जवळपास ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तानच्या कलाट भागात दोन प्रवासी बस एकमेकांना धडकल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर २० जण गंभीर जखमी झाले होते.
 

Related Articles