आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज   

पुणे : शहरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना तसेच मोठ्या आपत्तीची शक्यता गृहीत धरून त्वरित कारवाई करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. पालिकेच्या इमारातील सुसज्ज आपत्ती निवारण कक्ष उभारण्यात आला असून येथून शहरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस यंत्रणा तसेच पालिकेचे मिळून १४०० ते २००० सीसीटीव्हीद्वारे शहरावर अधिकार्‍यांची नजर राहणार असून यामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्वरित प्रतिसाद देणे आता शक्य होणार आहे. 
 
पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. शहरात दरवर्षी पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत असतात. तसेच इतर वेळेलाही शहरात अपघात, आग लागणे, अडकून पडणे, घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, वाहतुकीच्या मुख्य मार्गावर किंवा अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचणे अशा घटना घडतात. बरेचदा प्राणहानी व वित्तहानीही देखील होते. या बाबी टाळण्यासाठी मनपाच्या केंद्रीय कार्यालयस्थित हे नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
 
पुणे महानगरपालिका मुख्य इमारत व १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत २४ तास  नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार आहे. अधिकार्‍यांचे  संपर्क क्रमांक व संबंधित अधिकार्‍यार्‍यांची नावे देखील महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.  आपत्ती व  पुरप्रसंगी काळात नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करणेसाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ७१ निवारा केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत.  या कक्षाची जबाबदारी ही उपयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 
 
मदतीसाठी ’या’ क्रमांकावर करा फोन 
 
आपत्ती निवारण कक्षातून मदत मिळवण्यासाठी पालिकेने दूरध्वनी क्रमांक देखीक जाहिर केले आहेत. ०२०-२५५०१२६९,  ०२०-२५५०६८००, ०२०-६७८०१५०० या क्रमांकावर फोन करून नागरिकांना मदत मिळवता येणार आहे.   
 
पुण्यात नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत आपत्ती निवारण कक्षाची स्थापणा करण्यात आली आहे. हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधून माहिती किंवा मदत मागितल्यास तत्काळ कारवाई करता येणार आहे. शहरावर तब्बल १४०० सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून जिथे घटना घडली, त्या ठिकाणी पोलिसांना अथवा महापालिकेच्या यंत्रणेला माहिती देऊन तत्काळ मदत केली जाणार आहे. 
 
- संदीप खलाटे, आपत्ती निवारण कक्ष प्रमुख 

Related Articles