चीनच्या फटाका कारखान्यात स्फोट   

नऊ ठार ; २६ जण जखमी  

बीजिंग : चीनमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्यात  नऊ जणांचा मृत्यू झाला असून २६ जखमी झाले. मध्य चीनमधील हनान प्रांतातील लिनली भागात सोमवारी दुर्घटना घडली होती. 
 
प्रमुख वृत्तवाहिनीवर याबाबतची माहिती प्रसारीत झाली होती. स्फोटानंतर घटनास्थळावर आग भडकली. धुराचे लोट आकाशात उडत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरल्या. स्फोटात कारखाना स्थळाचे आणि परिसरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले. नागरिक प्रचंड घाबरले आणि ते जिवाच्या आकांताने धावत सुटल्याचे दिसून आले. सध्या घटनास्थळावर मदत आणि शोध कार्य हाती घेतले आहे. दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २६ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती झिन्हुआ वृत्त संस्थेने दिली. 
 
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, मदत पथके घटनास्थळी तातडीने रवाना केली आहेत. तसेच युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. दुसरी घटना घडू नये, याची दक्षता घ्यावी, असे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. स्फोटाचे कारण शोधण्यास सुरुवात झाली आहे. कारण लवकर समजले पाहिजे, या दिशेने प्रयत्न सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे.

Related Articles