अतिधोकादायक इमारती पाडणार   

आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

पुणे : शहरात अतिधोकादायक २१ इमारती आणि वाड्यांचाही समावेश आहे. या धोकादायक इमारतींना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका पाडणार असून, येथे राहणार्‍यांची इतर ठिकाणी व्यवस्था पावसाळा संपेपर्यंत महापालिका करणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
 
शहराच्या मध्यवस्तीत अनेक ठिकाणी जुने वाडे आणि इमारती आहेत. त्यांचे मालक व भाडेकरूंमध्ये वादविवाद असून, काही ठिकाणी मालकांमध्येही वाद आहेत. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कोणीही राहात नाहीत. त्यांची देखभाल, दुरुस्तीही होत नाही. त्यामुळे हे जुने वाडे-इमारती अधिकच खिळखिळ्या होत आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेकडून दर वर्षी अशा मिळकतींचे पाहणी केले जाते. त्यानुसार या मिळकतींचे अतिधोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक असे वर्गीकरण केले जाते. त्यात अतिधोकादायक इमारती अथवा वाडे उतरवले जातात. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. काही वेळा मिळकतधारकांकडून कारवाईला विरोध होतो. असे मिळकत धारक पालिकेच्या विरोधात न्यायालयात जातात. यात न्यायालयाने स्थगिती दिल्यास पालिकेला कारवाई थांबवावी लागते. जिथे दुरुस्ती शक्य आहे, तिथे तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जातात. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती झाली की नाही, याची पडताळणीही केली जाते.
 
अतिधोकादायक इमारती अथवा जुन्या वाड्यांना महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या (कलम १६० (ब) व (क)) अंतर्गत नोटीस बजावून या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शहरात दररोज पाऊस पडत असल्याने अतिधोकादायक असलेल्या २१ मिळकतींवर महापालिका कारवाई करणार आहे. या मिळकतींमध्ये राहणार्‍या ज्या नागरिकांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा नागरिकांची पावसाळा संपेपर्यंतची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Related Articles