बावधनमध्ये राडारोड्यामुळे वाहतूक कोंडी   

तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मनसेची मागणी 

पुणे :  बावधन येथील डॉ. होमी भाभा रस्ता (एनडीए-पाषाण रोड) वरील जुन्या बावधन पोलीस स्थानकसमोर असलेला गतिरोधक महापालिकेने  जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकला. मात्र, काढलेला राडारोडा रस्त्यावरच टाकून दिला. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. जेसीबीने रस्ता खरडल्यामुळे रस्ता घसरडा झाला असून, तेथे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. 
 
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात राडारोड्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. परिणामी, स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात तक्रारी केल्या.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने बुधवारी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, २४ तासांच्या आत राडारोडा हटवून रस्ता  तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल आणि त्यामुळे होणार्‍या नुकसानीस महापालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
 
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष गणेश साळी, संजय तोडमल, प्रभाग सचिव संदीप काळे, शाखाध्यक्ष अशोक मराठे, शाखाउपाध्यक्ष विजय ढाकणे, तसेच प्रेमनाथ उमाप, विजय बोरकर, राजेंद्र फुके, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Related Articles