मशीद समितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला   

संभल मशीद वाद  

लखनौ : शाही जामा मशीद आणि हरिहर मंदिर वादात संभल न्यायालयाने केलेल्या पाहणीविरुद्ध मशीद समितीचा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायालयीन आयुक्त नियुक्त करण्याचा आदेश आणि खटला कायम ठेवण्यायोग्य आहे. मशीद समिती आणि वादी हरी शंकर जैन खटल्याचे वकील आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी यापूर्वी या प्रकरणावरील आपला निर्णय राखून ठेवला होता.
 
शाही जामा मशीद व्यवस्थापन समितीने उच्च न्यायालयात संभल न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. संभल येथील मंदिर पाडल्यानंतर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती, असा दावा जैन आणि इतर सात जणांनी संभल येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग यांच्यासमोर दाखल केला   होता. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी हा खटला दाखल करण्यात आला आणि काही तासांतच न्यायाधीशांनी एका वकील आयुक्ताची नियुक्ती केली. त्यांना मशिदीची प्रारंभिक पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.
 
याविरुद्ध मशिदीच्या इंतेजामिया समितीने उच्च न्यायालयात दिवाणी पुनरीक्षण याचिका दाखल केली होती. यानंतर ८ जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन पाहणीला स्थगिती दिली. तसेच, सर्व विरोधी पक्षांकडून उत्तरे मागितली होती.
 

Related Articles