डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी   

पुणे : किडनी प्रत्यारोपण प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपी डॉ. अजय तावरे आणि प्रत्यारोपण समन्वयकांची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने डॉ. तावरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला. 
 
किडनी प्रत्यारोपण प्रकरणात न्यायालयाने डॉ. तावरेला पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. खासगी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहआरोपी असलेला ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीने दहा किडनी प्रत्यारोपणांना परवानगी दिली होती. तावरे हा तपासात सहकार्य करत नसून, तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तावरेच्या कार्यकाळात झालेल्या दहा किडनी प्रत्यारोपण प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येत आहे. किडनी प्रत्यारोपण प्रकरणाची आठ मार्च २०२२ रोजी बैठक झाली होती. समितीतील सर्व सदस्यांनी त्याच दिवशी किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी देऊन अहवालावर स्वाक्षरी केली होती.
 
हा अहवाल ११ मार्च २०२२ रोजी ससून रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची नोंद आहे. हा अहवाल तीन दिवस उशिरा पाठविण्यात आला. ससून रुग्णालयाचे किडनी प्रत्यारोपण समन्वयक बनसोडे आणि सुरवसे यांनी अहवाल उशिरा पाठविला, असे तावरेने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून तावरेच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन आडागळे यांनी केला. बचाव पक्षाकडून वकील सुधीर शहा यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. 

Related Articles