डॉ. अजय तावरेच्या निर्दोष मुक्ततेसाठी उद्या सुनावणी   

कल्याणीनगर अपघात प्रकरण 

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या मंगळवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे.या प्रकरणातील आरोपी आदित्य सूद याने देखील न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सोमवारी (ता.१९) सुनावणी होणार आहे. दोन्ही अर्जांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे,’ असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले. हा खटला जलदगतीने चालविण्यासाठी सरकार पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. साक्षीदारांची यादी, तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. आरोपनिश्चिती करण्यात येऊ नये, तसेच जामिनासह निर्दोष मुक्ततेसाठी वेगवेगळे अर्ज करून खटला लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अर्जांवरही सरकार पक्षाकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे,’ असेही हिरे यांनी नमूद केले.
 
सज्ञान ठरवण्याबाबत जून महिन्यात सुनावणी 
 
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरविण्यात यावे, याकरिता त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर जून महिन्यात सुनावणी होणार आहे.

Related Articles