बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा   

आता चलनावर दिसणार मंदिरे, ऐतिहासिक स्मारके 

ढाका : बांगलादेशचे राष्ट्रपिता आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा चलनी नोटांवरून हटविण्यात आली आहे. त्याऐवजी बौद्ध, हिंदू मंदिरे, निसर्गदृश्य आणि ऐतिहासिक स्मारकांच्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत. 
 
गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, त्यानंतर त्या देश सोडून गेल्या. हसीना यांनी पद सोडल्यानंतर महम्मद युनूस हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. अल्पसंख्यांकांवर हल्ले करण्यात आले. त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. धानमोंडी येथील शेख मुजीबूर  रहमान यांना समर्पित असलेल्या स्मारकालाही आग लावण्यात आली. याशिवाय शेख हसीना यांचे घरही जाळण्यात आले. आता ज्या नवीन चलनी नोटा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामधून हसीना यांच्या वडिलांची प्रतिमाही हटविण्यात आली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी आता बौद्ध, हिंदू मंदिरे, निसर्गदृश्य आणि ऐतिहासिक स्मारकांच्या प्रतिमा नोटांवर छापण्यात येत आहेत. 
 
एक जूनपासून बांगलादेशने नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली आहे. हंगामी सरकारच्या सूचनेनुसार २०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या बँक नोटा छापल्या जात असून, पुढील सहा महिन्यांत या नोटा वापरात येणार आहेत. बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर या नोटा वितरित करण्यात येतील. नवीन नोटांची रचना चित्रकार झैनुल आबेदीन यांनी तयार केली आहे. बंगालच्या दुष्काळाचेही चित्रण त्यात केले आहे, असे बांगलादेश बँकेच्या कार्यकारी संचालक हुस्नेरा शिखा यांनी सांगितले. 
 
आतापर्यंत बांगलादेशच्या चलनावर शेख मुजीबुर रहमान यांचे नाव दिसत होते. त्यांनी १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व केले. मात्र, १९७५ मध्ये एका बंडात त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, बांगलादेशात चलनी नोटांच्या रचनेत बदल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजकीय कारणांसाठी हे यापूर्वीही केले गेले आहे. १९७२ मध्ये देशाने स्वतंत्रता प्राप्त केल्यानंतर प्रथम आपल्या नोटांवर नकाशा छापला होता. नंतरच्या काळात शेख मुजीबूर  यांची प्रतिमा जवळपास सर्वच नोटांवर होती. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांची प्रतिमा सर्वच चलनांवर कायम होती.
 

Related Articles