म्युच्युअल फंडाचा मजबूत परतावा   

वृत्तवेध 

मार्च महिना म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरला. देशातील २९८ ओपन-एंडेड इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडांपैकी सुमारे ३८.६४ टक्के योजनांनी चांगली कामगिरी केली. ‘पीएल वेल्थ मॅनेजमेंट’च्या ताज्या अहवालानुसार ‘लार्ज कॅप फंडां’नी मार्चमध्ये सर्वात मजबूत परतावा दिला. ७१.८८ टक्के ‘लार्ज कॅप’ योजनांनी निफ्टी ५० ‘टीआरआय’ला मागे टाकले.
 
मिडकॅप आणि लार्ज-मिडकॅप फंडांनीही गुंतवणूकदारांना निराश केले नाही. ५८.०६ टक्के लार्ज आणि मिडकॅप फंडांनी त्यांच्या बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५०‘टीआरआय’पेक्षा चांगली कामगिरी केली. मिडकॅप फंडांमध्येही ५१.७२ टक्के योजनांनी बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा दिला. तथापि, मार्चमध्ये स्मॉल कॅप फंडांनी खराब कामगिरी केली. केवळ दहा टक्के ‘स्मॉल कॅप’ योजनांनी त्यांच्या बेंचमार्क निफ्टी स्मॉलकॅप २५० ‘टीआरआय’पेक्षा चांगली कामगिरी केली तर ७९ टक्के ‘स्मॉलकॅप’ फंडांनी फेब्रुवारीमधील बेंचमार्कपेक्षा चांगले परतावे दिले.
 
‘इक्विटी म्युच्युअल फंडां’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्तांमध्ये (एयूएम) देखील मार्च महिन्यात प्रचंड वाढ झाली. फेब्रुवारीमध्ये एकूण एयूएम २३.१२ लाख कोटी रुपये होते. मार्चमध्ये ते ७.६८ टक्क्यांनी वाढून २४.९० लाख कोटी रुपये झाले. क्षेत्रीय आणि विषयगत निधी वगळता, जवळजवळ सर्व श्रेणींमध्ये वाढ दिसून आली.
 
इतर फंड श्रेणींची कामगिरी
 
फ्लेक्सी कॅप फंड, फोकस्ड फंड आणि व्हॅल्यू/काँट्रा/डिव्हिडंड यिल्ड फंड यांनी मिश्र कामगिरी केली. या श्रेणींमधील २७ टक्के ते ३७ टक्के योजनांनी आपल्या बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा दिला. फेब्रुवारी २०२५ मध्ये म्युच्युअल फंडांनी थोडी चांगली कामगिरी केली. तेव्हा २९४ फंड योजनांपैकी ५४.०८ टक्के योजनांनी त्यांच्या बेंचमार्कपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. विशेषतः ‘स्मॉल कॅप फंडां’नी फेब्रुवारीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. मार्चमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही.

Related Articles