बंकर उभारणीवर भर   

उमर यांची पूंछला भेट

पूंछ/जम्मू : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पूंछ जिल्ह्याला भेट दिली. तसेच, पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या लोकांशी संवाद साधला. यासोबतच, या परिसरात बंकर उभारण्याची गरज व्यक्त केली.
 
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफांच्या भडिमारात बुधवारपासून आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला. यात, सर्वाधिक २० जण पूंछ जिल्ह्यात ठार झाले आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. अब्दुल्ला यांनी त्यांचे सल्लागार नासिर अस्लम वाणी आणि आमदार अजाज जान यांच्यासह पूंछला भेट दिली.
 
पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची, विशेषतः अमरजीत सिंग आणि अमरिक सिंग यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. तसेच, शोकाकुल नातेवाईकांचे सांत्वन केले. तर, स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. या भेटीचा उद्देश शोकाकुल कुटुंबांना आधार आणि सांत्वन देणे हा होता, असे उमर यांनी सांगितले. अब्दुल्ला यांनी सुरनकोट परिसरालाही भेट दिली. तसेच, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेल्या सीमावर्ती भागातील स्थानिकांशी संवाद साधला. 

Related Articles