सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद   

तैपेई : नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये त्यांनी एक नाही, दोन नाही, तब्बल चार सुवर्णपदके जिंकली आणि एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला. या जगज्जेत्याचे नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचे वय आहे १०५ वर्षं. वयाची शंभरी गाठल्यानंतरही कार्यरत राहणे मैदानावर असणें आणि जगज्जेतेपद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच सध्या या ज्येष्ठ तरुणाचे अख्ख्या जगात कौतुक होत आहे.  मुळात सवांग मैदानावर आले तेव्हाच ते जिंकले होते; कारण या वयात आयुष्य पाहणं आणि त्यातही मैदानावर लढायला सज्ज असणं हीच मोठी गोष्ट होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गटात त्यांना आव्हान द्यायला कोणीही स्पर्धक नव्हता. त्यांना गरज होती ती फक्त मैदानावर येऊन ती स्पर्धा पूर्ण करणे
 
सवांग यांनी शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धांमध्ये भाग घेतला. शंभर मीटर धावण्याची स्पर्धा तर त्यांनी स्पर्धात्मक वेळेत म्हणजे ३८.५५ सेकंदांत पूर्ण केली. या वयात अनेकजण चालू, फिरू शकणं तर सोडाच; पण त्याच्या कितीतरी आधीच त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. सवांग मात्र या प्रत्येक गोष्टीला अपवाद ठरले. 
 
आयुष्यभर ते कार्यरत असले तरी मुळात या स्पर्धात्मक जगात त्यांनी पाऊल ठेवलं, तेच मुळी वयाच्या नव्वदीनंतर! वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धांत त्यांनी आतापर्यंत साठपेक्षा जास्त पदकं मिळवलेली आहेत! शाळेत मुख्याध्यापक राहिलेले सवांग आजही शेतात जातात, शेतीचं काम पाहातात! खेळ खेळण्याची आणि स्पर्धात्मक खेळात आपला कस अजमावण्याची प्रेरणा त्यांना मिळाली ती त्यांच्या मुलीकडून. त्यांची ७३ वर्षीय मुलगी सिरीपान हीदेखील उत्तम खेळाडू आहे आणि तिनंही याच स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली. वडिलांचं कौतुक करताना तिलाही शब्द कमी पडतात. सिरीपान म्हणते, ‘शिस्तीचं दुसरं नाव म्हणजे आमचे वडील! त्यांच्याप्रती आम्हाला असलेल्या अभिमानानं आकाश ठेंगणं होतं. त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी. जे करायचं ठरवलं ते करणारच. आजही एखादी गोष्ट करण्यापासून त्यांना कोणीच परावृत्त करू शकत नाही.
 
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २०२४ ला झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेवढ्या थलिट्सनी भाग घेतला होता, त्याच्या दुपटीपेक्षाही जास्त थलिट या स्पर्धेत सहभागी झाले होते. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साधारण १०,५०० थलिट सहभागी झाले होते, तैपेईमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये सहभागी थलिट्सची संख्या होती २५,९५० आणि सहभागी झालेले देश होते १०७!
 
सवांग यांना पाच मुलं असून नातू, पणतू, खापरपणतूंचे ते धनी आहेत. सवांग म्हणतात, ‘माझी मुलगी आंतरराष्ट्रीय दर्जाची थलिट आहे, तिच्यामुळेच मला मैदानावर येण्याची प्रेरणा मिळाली हे तर खरंच; पण माझे अनेक मित्र, ओळखीचे, नातेवाईक... या सार्‍याच लोकांनी एकामागोमाग एक जग सोडलं, वय वाढत गेलं तसं अनेकांनी अंथरूण धरलं. वर्षानुवर्षे ते अजूनही अंथरुणावर आहेत, अनेक आजारांनी त्यांना घेरलेलं आहे आणि मृत्यूची ते वाट पाहताहेत, माझ्या बाबतीत असं काही होऊ नये याची काळजी मी घेतोय!’..

Related Articles