इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार   

खान युनूस, (गाझा पट्टी) : गाझा शहरात शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात २३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. यात तीन मुलांचा आणि काही महिलांचाही समावेश आहे. इस्रायलने गाझाला अन्न आणि औषधांसह सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यावर आक्षेप घेतला आहे. इस्रायल ओलिसांच्या सुटकेसाठी हमासवर दबाव आणत आहे. गाझातील मदत बंद करण्यावरून संताप वाढत असतानाच इस्रायलने हे हल्ले केले आहेत. दक्षिणेकडील खान युनूस शहरातील एका घरावर झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले. तर बलियाच्या उत्तरेकडील भागात पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या यूएनआरडब्लू या संस्थेच्या गोदामावरही हल्ला झाला. यात चार जण ठार झाले. गाझा शहराच्या सब्रा जिल्ह्यात हे हवाई हल्ले झाले. येथे १२ जण ठार झाले. त्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. 
 
इस्रायलने १८ मार्च रोजी गाझामध्ये पुन्हा बॉम्बहल्ला सुरू केला, ज्यामुळे हमाससोबत दोन महिन्यांचा युद्धविराम मोडला गेला. सैन्याने अर्ध्याहून अधिक प्रदेश ताब्यात घेतला आहे. उत्तर गाझा आणि दक्षिणेकडील राफा शहराच्या काही भागांवर ते छापे टाकत आहेत. इस्रायली कारवाईमुळे गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. इस्रायलने गाझात नाकेबंदी सुरू केली आहे. ही नाकेबंदी हमासवर उर्वरित ओलिसांना सोडण्यासाठी आणि नि:शस्त्रीकरण करण्यासाठी दबाव आणण्यासाठी आहे. मानवाधिकार गटांनी या नाकेबंदीला उपासमारीची युक्ती आणि संभाव्य युद्ध म्हटले आहे.
 
दरम्यान, गाझामधील १९ महिन्यांचे युद्ध हे इस्रायल आणि हमासमधील आतापर्यंतचे सर्वात विनाशकारी युद्ध आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या युद्धात आतापर्यंत ५२ हजार ८०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. १ लाख १९ हजारहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.   हमासने अजूनही इस्रायलच्या ५९ ओलिसांची सुटका केलेली नाही.
 

Related Articles