वाचक लिहितात   

निकृष्ट दर्जांची औषध निर्मिती 
 
हिमाचलमधील सोलन, बद्दी, उना, कांगडा, बारोतीवाला, कला अंब, नालागढ या व इतर काही ठिकाणी आम्लपित्त, ताप, रक्तदाब, सूज, संधिवात आणि हृदयरोग यांसारख्या आजारांवर उपचार करणार्‍या औषधांची निर्मिती केली जाते. त्यातील 37 औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या 50 औषधांचे नमुने सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्या प्रयोगशाळेने चाचणी केलेल्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. देशभरात 186 औषधांचे नमुने चाचण्यांमध्ये अपात्र ठरले. रुग्ण हजारो रुपये खर्च करून खरीदलेल्या औषधांचा औषधी परिणाम होत नाही यावरून सीडीएससीओने त्यांच्या नियमित आणि नैमित्तिक तपासणीअंतर्गत वरील माहिती उघड झाली. ज्या राज्यांनी त्यांच्या राज्यांतील तपासणी अहवाल सीडीएससीओला सादर केले नाहीत त्यांचे अहवाल मिळाल्यावर सीडीएससीओ नवा औषध चाचणी अहवाल सादर करतील. त्यात अपात्र औषधांची संख्या वाढण्याची शक्यता असू शकते. यावरून देशात उत्पादिल्या जाणार्‍या औषधांचा दर्जा तपासणी करण्यात सातत्य नसल्याचे समोर येते. चुकीचे प्रमाण, औषधातील भेसळ यांमुळे रुग्णांवर औषधांचे दुष्परिणाम होण्याच्या शक्यता असतात. याकरिता सर्वच लहान लहान शहरांत औषधे निर्माण करणार्‍या कंपन्यांवर औषधांची मिश्रणे, साठा विक्री यांची नियमित तपासणी करण्याची कारवाई कायम स्वरूपात सुरू ठेवून औषध निर्मात्या कंपन्यांच्या उत्पादनांवर वचक ठेवावा.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
मराठी द्वेष्ट्यांची मुजोरी 
 
मुंबईतील एअरटेल गॅलरीत हिंदी भाषेत बोलणार्‍या तरुणीला मराठीत बोलण्याची विनंती करणार्‍या मराठी मुलाला त्या मुलीने उर्मट भाषेत उत्तरे दिली. महाराष्ट्रात मराठी बोलण्याची गरजच काय ? आपण भारतात राहतो. भारतात कोणतीही भाषा बोलू शकतो असे म्हणत त्या मुलीने मराठी भाषेत बोलण्यास नकार दिला. त्या उर्मट मुलीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे गुन्हा आहे का ? असा प्रश्न पडला. मराठीची आणि मराठी माणसांची  अवहेलना होण्याची ही पहिलीच वेळ नाही  सातत्याने हे घडत आहे. महाराष्ट्रात मराठीची सतत अवहेलना होत आहे. महाराष्ट्रात मराठीतच बोला. मराठी द्वेष्ट्यांची मुजोरी मोडून काढा; अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातून मराठीच हद्दपार होईल आणि आपल्यावर फक्त पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
कायद्याचा धाक नाही
 
पुण्यात वाहनाची बारा जणांना धडक हे वृत्त वाचून वाईट वाटले. अशा दुर्घटना पाहता, पदपथ हे पादचार्‍यांसाठी चालण्यासाठी सुरक्षित नसून, ते मृत्यूचे सापळेच ठरत आहेत. मग पादचार्‍यांनी चालायचे तरी कुठून? असा प्रश्‍न मनात येतो. अशा प्रकारच्या घटना हल्ली वरचेवर घडत आहेत. पुण्याच्या या दुर्घटनेत काही जखमी एमपीएससी विद्यार्थ्यांचा समावेश आहे व ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाहने भरगर्दीत घुसून काहींचा जीव जातो. तर काहीजण जखमी होतात. याला दोन प्रमुख कारणे आहेत. एक वाहनचालक वाहने भरधाव वेगात चालवतात, तर दुसरे म्हणजे वाहनचालक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. याचाच अर्थ कायद्याचा धाक कोणालाच राहिलेला नाही.
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
वाहनांच्या वेगावर नियंत्रण हवे
 
राज्यात दरवर्षी सुमारे 22 लाख नवीन वाहनांची नोंद होते. मागील वर्षाअखेर राज्यात 4 कोटींहून अधिक वाहन चालविण्याचा परवानाधारक होते. नवीन वाहने विक्रीस उपलब्ध करून देताना वाहन निर्मात्या कंपन्या गाड्यांचा वेग, नवनवीन सुविधा यांची प्रसिद्धी करतात, आपल्याकडे वाहन कंपन्या, गाड्यांच्या डिझाईन्स, अंतर्गत सोयी जरी अद्ययावत करीत असल्या तरी रस्त्यांची रुंदी, मजबुती, नियमित दुरुस्त्या, आवश्यक त्या रस्त्यांची पुनर्बांधणी यांमध्ये सुधारणांची गती राखण्याऐवजी त्यातील गतिवाढीला प्रशासकीय गरजांनुसार मंजुरी दिली जात असल्याने विदेशी कंपन्यांच्या साहाय्याने देशात निर्मिल्या जाणार्‍या देशी गाड्यांचा वापर करताना रस्त्यांच्या अवस्थांचा विचार केला जात नाही. जुनी, नवी वाहने रस्त्यांवर एकत्रित धावताना, रस्त्यांची स्थिती, वाहनचालकांची दमछाक या सर्व बाबींचा विचार केल्यास अपघातांची संख्या वाढल्यास नवल वाटू नये. वार्‍याच्या वेगाने वाहन हाकणे, नशेत आणि कानाला मोबाईल लावून वाहन चालविणे, प्रसंगी वाहनाचा वेग वाढविणे/मर्यादित करणे, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवता न येणे अशा कारणांनी अपघात होत असतात. तीन वर्षांत सुमारे 46 हजार नागरिकांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला असून प्रतिवर्षी किमान 32000 अपघात होतात. ही आकडेवारी पाहता अपघातांची संख्यावाढ रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे प्रश्न परिवहन विभागासमोर उपस्थित होत आहेत. निव्वळ दंड आकारून अपघातांची संख्या रोखता येणार नाही. प्रत्येक वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वेच्छेने पाळण्याची जशी गरज आहे तशीच त्याने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे हे समजून घ्यायला हवे. 
 
स्नेहा राज, गोरेगांव.

Related Articles