भारतीय खाद्यपदार्थांचा वरचष्मा   

अर्थनगरीतून : महेश देशपांडे 

भारतीय  खाद्य पदार्थांची अनेक देशांतील निर्यात वाढत आहे.आणखी एक लक्षवेधी बातमी म्हणजे खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे ‘ओपेक’ने ठरवले  आहे.त्यामुळे देशात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का?  या कडेही अनेकांचे लक्ष आहे.   
 
गेल्या आर्थिक वर्षात स्मार्टफोन ही भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी वस्तू ठरली; परंतु आता भारतीय बिस्किटे, नूडल्स, पॅक बंद बेसन, साबण आणि शाम्पूदेखील परदेशी बाजारपेठेत वेगाने आपले स्थान निर्माण करत आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), आयटीसी, मेरिको, गोदरेज, डाबर, एडबल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस (पूर्वीची अदानी विल्मर) सारख्या मोठ्या ‘एफएमसीजी कंपन्यांची निर्यात गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये  देशांतर्गत विक्रीपेक्षा वेगाने वाढली. ‘एचयूएल’सारख्या काही कंपन्यांच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त तीन टक्के आंतरराष्ट्रीय व्यवसाय असू शकतो; परंतु डाबर, ईमामी आणि मेरिकोसारख्या कंपन्यांसाठी तो वीस टक्क्यांपेक्षा जास्त महसूल आणत आहे. ‘एचयूएल’ची निर्यात शाखा ‘युनिलिव्हर इंडिया एक्सपोर्टस लिमिटेड’ने गेल्या आर्थिक वर्षात १,२५८ कोटी रुपयांची विक्री नोंदवली. त्यात आठ टक्के वाढ आहे. त्यांचा निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून ९१ कोटी रुपये झाला. दुसरीकडे कमकुवत देशांतर्गत मागणीमुळे ‘एचयूएल’ची एकूण विक्री केवळ दोन टक्क्यांनी वाढली.
 
‘एचयूएल’ च्या डव्ह, हॉर्लिक्स, व्हॅसलीन, पिअर्स, ब्रू, सनसिल्क, ग्लो अँड लवली, पॉन्ड्स, लॅक्मे आणि लाईफबॉय सारख्या ब्रँडना परदेशात मोठी मागणी आहे. ‘एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस’चे ‘सीईओ’ अंगशु मलिक यांच्या मते फक्त बासमती तांदूळच नाही तर, मोहरी आणि सूर्यफूल तेल, पीठ, बेसन, सोया नगेट्स आणि पोहे यासारख्या उत्पादनांनाही परदेशी बाजारपेठेत मागणी आहे. पाश्चात्य देशांमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे निर्यात वाढत आहे. केवळ भारतीय वंशाचे लोकच नाही, तर परदेशी लोकही आमची उत्पादने खरेदी करत आहेत.
 
‘एडब्ल्यूएल’च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांचा ब्रँडेड निर्यात व्यवसाय तिप्पट वाढला आहे. उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की मागणीसोबतच अन्न प्रक्रिया उद्योग आणि बाजारआधारित उत्पादनांसाठी ‘सरकारी निर्यात प्रोत्साहन कार्यक्रमदेखील या तेजीमध्ये मदत करत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये सरकारने जागतिक बाजारपेठेत भारतीय ब्रँडेड अन्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएलआय’ योजनेअंतर्गत ७३ कंपन्यांची निवड केली. ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ने  म्हटले आहे की त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे ऑपरेटिंग मार्जिन २०२५ मध्ये १७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. दोन वर्षांपूर्वी ते दहा टक्के होते.‘मॅरिको’ने विश्लेषकांना सांगितले की त्यांचा निर्यात व्यवसाय वेगाने वाढत असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये स्थिर चलनात (चलनातील चढउतार वगळता) १४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे, तर त्यांची एकूण वाढ १२ टक्के होती. डाबरच्या निर्यातीमध्ये १७ टक्के वाढ झाली आहे. पण त्यांची एकूण महसूलवाढ फक्त १.३ टक्के होती. ‘‘आयटीसी’ने म्हटले आहे की आम्ही जवळच्या बाजारपेठांमध्ये  संधी शोधत आहोत. ‘आयटीसी’च्या परकीय चलन उत्पन्नाचा बहुतांश भाग अजूनही कृषी उत्पादनांच्या निर्यातीतून येतो. गेल्या वर्षी  त्यात सात टक्के वाढ होऊन ७,७०८ कोटी रुपये झाला; परंतु आता त्यांची ‘एफएमसीजी’ निर्यातीत मोठी वाढ होण्याच्या मार्गावर आहे. कंपनी म्हणते की त्यांची ‘एफएमसीजी’ उत्पादने आता ७० हून अधिक देशांमध्ये विकली जातात. 
 
परदेशात भारतीय खाद्यपदार्थांच्या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. भारतीय रेस्टॉरंट्स आणि भारतीय पाककृतींची मागणी केवळ भारतीय वंशाच्या लोकांमध्येच नाही, तर इतर देशांमध्येही वाढत आहे. तथापि, निर्यातीत वाढ असूनही काही आव्हाने आहेत. जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, चलनातील चढउतार आणि लॉजिस्टिक्स खर्च यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे; परंतु कंपन्या त्यांना तोंड देण्यास तयार आहेत.परकीय चलनाचा साठा वाढला. ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच देशाचा परकीय चलनचा साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला. चालू वर्षात भारताच्या परकीय चलन साठ्यात ५८.३९ डॉलर अब्जची वाढ झाली आहे.  भारत हा सर्वाधिक परकीय चलनसाठा असणारा जगातील चौथा देश आहे. भारताला  विक्रम मोडण्यासाठी अजून दोन अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. सर्वाधिक परकीय चलनसाठ्यात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जपान दुसर्‍या तर स्वित्झर्लंड तिसर्‍या क्रमांकावर आहे.
 
रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार २७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठी ४.८४ अब्ज डॉलर्सने वाढून ७०२.७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारताचा परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला होता. म्हणजे नऊ महिन्यांमध्ये भारताचा परकीय चलनसाठा उच्चांकावर पोहचला आहे.  सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस परकीय चलन साठा ७०४.८८ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. मागील आठवड्यात तो घसरला होता. ही घट १.०१ अब्ज डॉलर इतकी होती. त्यामुळे मागील आठवड्यातील साठा ६९७.९३ अब्ज डॉलरवर होता.रिझर्व बँकेने सांगितले की २७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात फॉरेन करन्सी असेट्समध्ये ५.७५ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढ झाली आहे. आता ही मालमत्ता ५९४.८२ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. सोन्याच्या साठ्यामध्ये १.२३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. देशाचा सोन्याचा साठा ८४.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. एसडीआर १५८ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.८३ अब्ज डॉलर्स झाला आहे. तसेच जागतिक नाणेनिधीकडे भारताचा राखीव निधी १७६ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.६२ अब्ज डॉलर्स झाला आहे.
 
तेल उत्पादक देशांची संघटना (ओपेक) ऑगस्ट महिन्यापासून तेलाचा पुरवठा वाढवणार आहे. संघटनेच्या आठ सदस्य देशांनी ख्खनिज तेलाचा पुरवठा दररोज पाच लाख ४८ हजार पिंपांनी वाढवण्याचे मान्य केले आहे.  त्यामुळे ख्खनिज तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘ओपेक’ने मे, जून आणि जुलैमध्ये ख्खनिज तेलाच्या पुरवठ्यात चार लाख ११ हजार पिंपांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. यामुळे भारतातही तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो आणि ‘ओपेक’ त्याचा प्रमुख पुरवठादार आहे. यामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींमध्येही दिलासा देणे सरकारला शक्य आहे, तसे होणार का हा प्रश्न आहे.खनिज तेलाच्या किमती कमी झाल्यास देशातील सामान्यजनतेस फायदा होईल. याचा परिणाम वाहतूक आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होईल.   

Related Articles