वसंत व्याख्यानमालेचे उदारमतवादी अध्यक्ष - डॉ. दीपक टिळक   

मंदार बेडेकर,कार्यवाह वसंत व्याख्यानमाला 

वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक सरांच्या निधनाची वार्ता समजली आणि गेल्या सुमारे २२-२३ वर्षांतील शेकडो आठवणींनी मनात गर्दी करायला सुरुवात केली. वसंत व्याख्यानमालेचा (तेव्हाचा) तरुण कार्यकर्ता या नात्याने माझा टिळक परिवाराशी ऋणानुबंध दादा (कै. जयंतराव टिळक) अध्यक्ष असल्यापासून निर्माण झाला होता; पण डॉ. दीपक टिळक यांनी (दादांच्या निधनानंतर) वसंत व्याख्यानमालेची सूत्रे हाती घेतल्यापासून माझा आणि टिळक परिवाराचा स्नेहबंध दृढ होत गेला.
 
डॉ. दीपक टिळक यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी मला वक्तृत्वोत्तेजक सभा (वसंत व्याख्यानमालेची मातृसंस्था) या संस्थेच्या कार्यकारी मंडळात निवडले आणि त्यानंतर अल्पावधीत तेव्हापासून ते वसंत व्याख्यानमालेच्या १५० व्या ज्ञानसत्राच्या समारोप समारंभाचे मी सूत्रसंचलन केले. (२० मे, २०२५) त्या दिवसापर्यंत, जवळजवळ पंचवीस वर्षांतील अनेकानेक प्रसंग आत्ता हे लिहित असताना माझ्या स्मृतिपटलावर आहेत.महनीय व्यक्तींचा वारसा जपताना परिपक्व निर्णय घेणारे विश्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा कायापालट करणारे धडाडीचे कुलगुरू, वेदांच्या जतनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर स्वीकारणारे द्रष्टे संस्था प्रमुख, वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून नवनवीन विचारांना, व्यक्तींना आणि कल्पनांना साकार होऊ देणारे उदारमतवादी अध्यक्ष असे त्यांचे अनेक पैलू मी जवळून अनुभवले आहेत.
 
वसंत व्याख्यानमालेसंदर्भात डॉ. दीपक सरांच्या आठवणी लिहायच्या तर त्यासुद्धा सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक इत्यादी विविध दृष्टिकोनांतून नोंदविता येतील. वसंत व्याख्यानमालेसारख्या लब्धप्रतिष्ठित उपक्रमाचे प्रमुख म्हणून डॉ. दीपक सरांनी नेहमीच उदार आणि सर्व समावेशक धोरण ठेवले आणि म्हणूनच, मराठी साहित्याचे ख्रिस्ती अभ्यासक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापासून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या शमसुद्दिन तांबोळींपर्यंत आणि हिंदुजनजागृती समितीच्या वक्ता प्रतिनिधींपासून ते साम्यवादी नेते कॉम्रेड अजित अभ्यंकरांपर्यंत विभिन्न विचारसरणी मानणारे वक्ते या व्यासपीठावरून बोलले.
   
डॉ. दीपक सरांची सांस्कृतिक जाण प्रगल्भ असल्यामुळे, वसंत व्याख्यानमालेतील कार्यक्रमांचा आवाका ‘वाढता वाढता वाढे’ असा समृद्ध होऊ शकला. नेहमीच्या भाषणांचा प्रघात बाजूला ठेवून महेश काळे, नागराज मंजुळे अशा कलाकरांच्या मुलाखती, धार्मिक /संस्कारांच्या विषयांपासून ते ‘घटस्फोटाच्या वकिलांचे’ भाषण किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ विषयी मुक्त चिंतन इथपर्यंत आणि अस्खलित मराठी बोलणार्‍या जपानी अभ्यासकापासून ते संगणक क्रांती/ कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या विषयापर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलो. ते डॉ. दीपक सरांच्या डोळस पाठिंब्यामुळेच! सरांनी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच हेरले की वक्त्यांना दिले जाणारे मानधन कमी असते. आर्थिक भान पक्के असणार्‍या सरांनी आम्हाला सांगितले की ‘वक्त्यांचे मानधान वाढवा’ व्याख्यानमालेला प्रायोजक/जाहिरातदार मिळण्याची व्यवस्था करून आणि प्रसंगी स्वतः काही संस्थांच्या माध्यमातून लक्षावधी रुपयांच्या देणग्या देऊन, वसंत व्याख्यानमालेला आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याचे मोठ्ठे योगदान दीपक सरांनी दिले आहे. संस्थेची प्रशासकीय कामे मार्गी लावणे, संस्थेला आर्थिक बळ देणे, संस्था परंपराप्रिय राहूनही आधुनिक होत राहील असे प्रयत्न करणे, अशा अनेक परींनी वसंत व्याख्यानमाला टिकवणे, वाढवणे यांमध्ये अध्यक्ष या नात्याने डॉ. दीपक टिळक सरांनी दिलेले योगदान संस्मरणीय आहे आणि राहील. सरांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली.

Related Articles